पंढरपूर : बिल न भरल्यास वीजपुरवठा होणार खंडित



पंढरपूर/प्रतिनिधी:

 पंढरपूर विभागात महावितरण कंपनीची घरगुती व शेती पंप दोन्ही मिळून सुमारे १५६२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार महावितरण मंडळाकडून गेल्या दहा महिन्यांपासून थकबाकी न भरलेल्या ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून नोटीस पाठवण्यात येत आहे. ग्राहकांनी थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजय गवळी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

महावितरण मंडळाकडून शेती पंपधारक ग्राहकांसाठी योजना

राज्याच्या वीज मंडळाकडून शेती पंपाच्या थकबाकीवर ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. ही मुदत २०२४ पर्यंत असणार आहे. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या तालुक्यातील एक लाख आठ हजार शेतकऱ्यांकडे शेती पंपाची थकबाकी जवळपास दिड हजार कोटींच्या घरात आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत गावांमध्ये जाऊन वीजबिल भरण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, कार्यशाळा, शिबिरे घेण्यात येत आहेत. महावितरणकडून थकीत वीज बिलाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे, तसेच ग्रामपंचायत, पतसंस्था, साखर कारखान्यांकडून देखील थकबाकी वसूल करण्यात येत आहे. या थकबाकी वसुलीच्या तीस टक्के रक्कम संबंधित संस्थांना देण्यात येणार आहे. गावाच्या विकासासाठी ही रक्कम देण्यात येणार आहे.

(Advertise)

वीजबिल न भरल्यास पुरवठा खंडित होणार

शहरी व ग्रामीण भागातील महावितरणच्या घरगुती ग्राहकांनी सुमारे वर्षभर वीजबिल भरले नाही, त्यामुळे थकीत असलेले बिल वाढत चालले आहे. महावितरण मंडळाकडून थकबाकी वसूल करण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. जे ग्राहक थकीत बिल भरणार नाही त्याचा वीजपुरवठा खंडीत करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पंढरपूर विभागामध्ये केवळ ६० टक्केच ग्राहकांनी आपले वीजबिल भरले आहे. तर ४० टक्के ग्राहकांकडून बिल वसूल करण्यासाठी महावितरणकडून कठोर पाऊले उचलण्यात येत आहेत.

बिल न भरल्यास वीजपुरवठा होणार खंडित
विविध पक्षांनी केली वीजबिल माफिची मागणी

राज्य सरकारने लॉकडाउन काळातील वीजबिल माफ करावे अशी मागणी विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र अद्यापही वीजबिल माफीबाबत राज्य सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ऊर्जा विभागाकडून वीजबिल भरण्याची सक्ती करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Post a Comment

0 Comments