प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :
"आम्ही जांभळीकर या टॅगखाली ऑक्सीजन पार्कचा वर्षपूर्ती समारंभ सोहळा जांभळी ता.शिरोळ येथे सिने अभिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
सुरुवातीस ऑक्सीजन पार्क चे उद्घाटन करून जांभळीकरानी लावलेल्या विविध झाडांचे पाहणी करून त्या विषयी पूर्ण माहिती घेतली त्यानंतर रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी इनरव्हील क्लब यांच्या सहकार्यातून पाण्याच्या टाकीचे उद्घाटन ही त्यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील शाळेच्या मुलीने त्यांना मानवंदना देऊन त्यांच्या हस्ते नवीन पाच एकर जागेमध्ये ऑक्सीजन पार्क च्या विस्तारीकरणासाठी त्यांच्या हस्ते कुदळ मारून व नारळ वाढविण्यात आला.
वर्षपूर्ती सोहळ्याचं निमित्त्याने पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत करून माननीय भोसले यांनी या ऑक्सिजन पार्कची संकल्पना व निर्मितीची माहिती दिली. यासाठी त्यांनी आलेल्या चांगल्या- वाईट प्रसंगाचा उल्लेख केला. फेब्रुवारी २०२० मध्ये कोरोनाच्या काळात सुरू झालेल्या कुमार विद्या मंदिर शाळेच्या स्वच्छतेपासून सलमान कुडचे व शशिकांत घाटगे यांनी सुरू केलेल्या कामाच्या श्रीगणेशा होय. त्यानंतर मात्र उत्तम व प्रामाणिक ग्रुप निर्मिती पासून ते ऑक्सीजन पार्कच्या वर्षपूर्ती पर्यंतचा प्रवास त्यांनी सांगितला. यासाठी 'महाराष्ट्राचे ट्री मॅन' मा. रघुनाथ ढोले यांनी दिलेल्या १००० रोपांचे उल्लेख करून त्या रोपांचे रोपण करून ग्रुपमधील प्रामाणिक सदस्यांच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन केले त्यामुळे ९९टक्के झाडे जगली आहेत.
आम्ही जांभळीकर ही लेखमाला प्रसिद्ध करून आलेले अनुभव या माध्यमातून कळत गेले.या वृक्षरोपण प्रक्रियेत महिलांनी दिलेला दररोज २ तास तसेच संजय घोडावत व सा.रे.पाटील ग्रुपच्या वतीने जे.सी.बी मशीनची व्यवस्था त्याचबरोबर नेचर एक्सपर्ट विजय निंबाळकर व सुहास वायंगणकर या दोघांकडून मिळालेला प्रचंड सहकार्य यामुळे आज वर्षपूर्ती सोहळा कार्यक्रम करीत आहोत. तसेच भविष्यात सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री वनराई संस्थेच्या माध्यमातून काम करायला तयार आहोत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली.
नेचर एक्सपोर्ट सुहास वायंगणकर यांनी याप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, १३ जिल्ह्यांमध्ये ३३ देवराई निर्माण झालेली असून त्यामध्ये जवळपास ४ लाख ५० हजार वृक्षारोपण करण्यात आले आहे. यामध्ये १४७ पेक्षा अधिक देशी जातीची झाडे लावण्यात आली आहेत.भविष्यात महाराष्ट्रातील प्रत्येक गावात ग्रीन आर्मीचे सदस्य निर्माण करायचे आहेत. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे प्रमुख मुनोत यांनी जांभळीकरांचे हात बळकट करण्यासाठी रोटरी क्लब नेहमीच तत्पर राहील अशाप्रकारचा आशावाद त्यांनी दिला. याच कार्यक्रमामध्ये कलाशिक्षक श्रीरंग मोरे यांनी सिने कलाकार सयाजी शिंदे यांचे रेखाटलेले पेंटिंग फोटो भेट देऊन त्यांच्या कामाविषयी आत्मीयता व्यक्त केली. यानंतर ग्रामसेवक व जांभळी ग्राम पंचायतीचे सर्व सदस्यांनी मंजूर झालेल्या पाच एकर प्रकल्पाचे पत्र त्यांनी सयाजी शिंदे यांना दिले.
या वर्षपूर्ती सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी सिने अभिनेता सयाजी शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना म्हणाले की,खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मी आलो. मात्र जांभळीकरांचे श्रमदान व वृक्षा रोपन व संवर्धन करण्याची तळमळ पाहून मी स्वतः प्रभावित झालो आहे. जर मला कोणी विचारलं येथून काय घेऊन जाणार तर मी छातीठोकपणे सांगेन की, जांभळीकरांची प्रचंड ऊर्जा होय अशा प्रकारचे गौरवोद्गार त्यांनी या प्रसंगी काढले. माननीय सयाजी शिंदे यांना वनराईच्या माध्यमातून जांभळी या गावास महाराष्ट्रातील एक आदर्श गाव निर्माण करावयाचे आहे. यासाठी त्यांनी गावातील मतभेद व राजकारण विसरून सर्वांनी एकत्रित येऊन एक दिलाने व प्रचंड ऊर्जेने काम केल्यास हे शक्य होणार आहे.
यासाठी गावातील शाळेत एक प्रस्ताव व ठराव करून दर शनिवारी २ तासासाठी मुलांनी श्रमदान करावे त्याचबरोबर जयसिंगपूर कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.प्रभाकर माने यांच्याशी संवाद साधून कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सर्व प्रकारचे मदत करुन वनराई निर्माण करण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय सेवा यांच्या कडून मदत व्हावी यासाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाची चर्चा केलेली आहे. याप्रसंगी त्यांनी स्वरचित 'झाड' नावाची कविता सादर केली या कवितेतून त्यांचे वृक्ष प्रेम दिसून आले. सरतेशेवटी तेलगू भाषेतून डायलॉग सादर करून त्याचा मराठीत अर्थ सांगून त्यामधून शेतकरी राजा विषयी पाठिंबा व्यक्त केला. एकूणच सयाजी शिंदे म्हणजे एक सामाजिक व वृक्ष चळवळीचे खरेखुरे कलाकार आहेत. अशा प्रकारची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.
या कार्यक्रमाचे आभार आकाश यादव यांनी मानले असून या कार्यक्रमास शिरोळ पंचायत समितीचे सभापती कविता चौगुले, पंचायत समिती सदस्य माने, प्रशासक, तलाठी,जांभळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व आम्ही जांभळीकर ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमास स्वर्गीय सा.रे.पाटील जांभळी हायस्कूल,जांभळी स्काऊट गाईडचे विद्यार्थी व शिक्षकांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वृक्ष चळवळीची ऊर्जा निर्माण झाली आहे अशा प्रकारचे मत लोकांनी व्यक्त केले आहे.
0 Comments