देशात २१ दिवसांत पन्नास लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण


गेल्या २१ दिवसांत भारतामध्ये ५० लाख आरोग्य व आघाडीच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, असे आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी राज्यसभेत मंगळवारी सांगितले.

लस घेण्यास लोकांचा विरोध असल्याच्या मुद्दय़ावर त्यांनी सांगितले, की जगात भारतामध्ये सर्वाधिक वेगाने लसीकरण झाले आहे. कोविड १९ प्रतिबंधक लस देण्याचा कार्यक्रम सुरू असून ‘को-विन पोर्टल’मधील काही अडचणींमुळे लोकांचा सहभाग घटला तसेच काही लोकांचा लस घेण्यास विरोध आहे पण या गोष्टींवर विचार करण्यात येत आहे. एकूण ९३.६ लाख आरोग्य कर्मचारी व ७७.९ लाख आघाडीचे कर्मचारी यांची लसीकरणासाठी ३१ जानेवारीअखेर नोंद झाली आहे. ३१ जानेवारी अखेर ३७.५८ लाख जणांना लस देण्यात आली असून सुरुवातीला प्रमाण कमी होते पण नंतर ते वाढत गेले. आरोग्य कर्मचाऱ्यांचा लशीवर विश्वास नाही काय, असे विचारले असता त्यांनी सांगितले, की ही बाब खरी नाही. पन्नास लाख आरोग्य कर्मचारी व आघाडीचे कर्मचारी यांना २१ दिवसांत लस देण्यात आली आहे.

(Advertise)

कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत असून लसीकरणाबाबतच्या गैरमाहितीला अटकाव करण्यात येत आहे. लशीबाबत योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी संज्ञापन धोरण तयार करण्यात आले असून बहुमाध्यमातून त्याचा वापर केला जाईल. १६ जानेवारीपासून देशात लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असून सुरुवातीला आरोग्य व आघाडीच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे, त्यांना ही लस मोफत दिली जात असून २६ जानेवारीपर्यंत कोव्हिशिल्ड लशीच्या २०० लाख तर कोव्हॅक्सिन लशीच्या २८.०३ लाख मात्रा खरेदी करण्यात आल्या आहेत, असे चौबे म्हणाल्या.

(Advertise)

२४ तासांत नऊ हजार ११० जण बाधित

नवी दिल्ली : देशात  गेल्या २४ तासांत आणखी नऊ हजार ११० जणांना करोनाची लागण झाली, तर आणखी ७८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.  या महिन्यात १० हजारांपेक्षा कमी जणांना करोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. सध्या देशात एक कोटी, आठ लाख, ४७ हजार, ३०४ जण करोनाबाधित आहेत, तर सलग चौथ्या दिवशी करोनामुळे १०० हून कमी जणांचा मृत्यू झाला आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.  मृतांची एकूण संख्या एका लाख, ५५ हजार १५८ वर पोहोचली आहे.  एक कोटी, पाच लाख, ४८ हजार, ५२१ जण करोनातून बरे झाले आहेत.

Post a Comment

0 Comments