कोरोनाच्या पाठोपाठ बर्ड फ्लूने देशात एकच हाहाकार माजवला आहे. देशातील दहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूच्या केसेस समोर आल्या आहेत. यामुळे लोकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण होते आणि आता लोकांनी अंडी त्याचबरोबर चिकनकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळते.
देशाची राजधानी दिल्लीच्या उत्तर महानगरपालिकेने अंडी आणि कोंबडीचे मांस यासंदर्भात नवीन आदेश जारी केला आहे. आता दिल्लीच्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये खवय्यांना चिकन आणि अंडी दिली जाणार नाहीत. जर, कोणी या नियमांचे उल्लंघन केले, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. बर्ड फ्लूचा प्रसार थांबवण्यासाठी दिल्ली सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
यामुळे देशभरातील २०% पोल्ट्री व्यवसायावर गदा येणार आहे. अंड्यांच्या किंमती सातत्याने देशात घसरत आहेत. गुरुवारी अंड्यांचा दर २९५ रुपये प्रति शेकडावर आला आहे. १०० अंड्यांवर १५ ते २० रुपयांचा नफा होणारा कामगार वर्ग त्यामुळे अडचणीत आला आहे. पोल्ट्री व्यवसाय २०१९ पासूनच नुकसानीत जाताना पाहायला मिळत आहे. अंडी पोल्ट्री पासून विक्रेत्यांच्या दुकानात येईपर्यंतच किमती तीन ते चार वेळा बदललेल्या असतात. राज्य घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, असे करत एकत्रितपणे दरासंदर्भात निर्णय घेतले जातात. बर्ड फ्लू ची भीती आणि गुंतवलेले पैसे याची सांगड घालता घालता पोल्ट्री व्यवसायिकांची स्थिती बिकट झाली आहे.
0 Comments