हैदराबाद - राष्टीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या, 'महिलेला कोणतीही निवडणूक लढवायची असल्यास तिचा पुरुष नेत्याशी संपर्क असणे गरजेचे आहे. असे असेल तरच महिलांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले जाते.' रेखा शर्मा या हैदराबादमध्ये मौलाना आझाद नॅशनल उर्दू महाविद्यालयाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिलांच्या राजकारणातील सद्यस्थितीबद्दल खंत व्यक्त केली.
यावेळी रेखा शर्मा यांनी सरकारमधील महत्त्वाच्या खात्यावर अनेक महिला असल्याचे सांगितले. मात्र ही संख्या अतिशय कमी असल्याचे म्हणत ही बाब चिंता वाढवणारी असल्याचे म्हणाल्या. तसेच, महिलांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळण्याची गरजही आहे. महिलांना निर्णय घेण्याचा अधिकार संसदेत आणि विधिमंडळात असणे आवश्यक आहे. अन्यथा त्या फक्त घरातील काम करत राहतील, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केलीये.
यावेळी रेखा शर्मा म्हणाल्या, निवडणुकीत महिलांना डावलले जाते, कोणाताही राजकीय पक्ष महिला नेत्यांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देण्यासाठी उत्सूक नसतो. तसेच महिला निवडणूक जिंकू शकेल का?, असा प्रश्न उपस्थित करत महिलांना डावलले जातेय. ज्या व्यक्तीची प्रतीमा मलीन झालेली असते. ज्यांच्यावरोधात गंभीर आरोप असतात, अशा उमेदवारांना विविध पक्षांकडून आवर्जून तिकीट दिले जाते.' असे निरीक्षण नोंदवत त्यांनी भारतातील राजकीय पक्षांवर टीकात्मक भाष्य केले आहे.
0 Comments