"वक्त्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता विकसित : प्राचार्य डॉ.राजेखान शानेदिवाण"

प्रा.डॉ.प्रभाकर माने / शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

येथील 'राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रूकडी' आणि  'रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेन्ट्रल' यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कै. संभाजीराव माने स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्त्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजकांनी  सदर स्पर्धेतील विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे  पुरस्कार देऊन त्यांना यथोचित गौरवण्यात आले.
            
राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या कला व सुप्त गुणांना संधी देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे प्रत्येक शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन  केले जात असते. मात्र यावर्षी कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर अशा कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करता आले नाही. परंतु प्राचार्य डॉ. राजगे यांच्या नेतृत्वाखाली ऑनलाइन पद्धतीच्या कार्यक्रमाची काही प्रमाणात रेलचेल मात्र होती. या सर्व गोष्टींशी संबंधित व त्याचाच एक भाग म्हणून हा अनोखा उपक्रम राज्यस्तरीय पातळीवर राबविण्यात आला.
      

या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रशांत कांबळे यांनी केले. त्यांनी या स्पर्धा आयोजना बाबतचा हेतू स्पष्ट केला.तसेच अहवाल वाचन शारीरिक शिक्षण संचालक श्री.भाऊसाहेब वडार यांनी सादर केले. सदर विजेत्या स्पर्धकांचे  व गुणी विद्यार्थ्यांचे गोड कौतुक करून माजी खासदार श्रीमती निवेदिता माने व सचिव खासदार धैर्यशील माने यांनी मनस्वी शुभेच्छा दिल्या.  
        
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शहाजी कॉलेज,कोल्हापूर प्राचार्य, डॉ.राजेखान शानेदिवाण हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, वक्त्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता विकसित होते, विचारांची दिशा कशी असावी याचे आकलन होते, विचार प्रक्रियेला चालना  या स्पर्धेतून मिळत असते, विद्यार्थ्यांनी  आपले विचार मांडताना आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत, विद्यार्थी हा महाविद्यालयाचा आत्मा आहे तो जसा पुढे जाईल तसा महाविद्यालयाचा नावलौकिक होत असतो, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक आहे.   
           
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे म्हणाले विजेत्या स्पर्धकांबरोबरच सहभागी स्पर्धक सुद्धा महत्त्वाचे आहेत , आपण स्पर्धेत सहभाग घेतला म्हणून संयोजकांना विजेते ठरविता आले, स्पर्धेतून आपण बरेच काही शिकत असतो एखाद्या स्पर्धेत आपण जिंकलो नाही म्हणून हार मानू नये, पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करा यश निश्चितच प्राप्त होईल अशा प्रकारचा आशावादी व सकारात्मक विचार त्यांनी मांडले.
    
या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक कु. श्रुती अशोक बोरस्ते , एच. पी. टी. कॉलेज नाशिक ,व्दितीय क्रमांक श्री. अमोल रामचंद्र गोळे , डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड व तृतीय क्रमांक श्री. शिवम संजय माळकर, सहकारभूषण एस. के. पाटील महाविद्यालय कुरुंदवाड तसेच उत्तेजनार्थ प्रथम    श्री.अक्षय मारुती ईळके , नाईट कॉलेज  इचलकरंजी , व्दितीय  श्री. दत्तात्रय नाश्याबा  चोरमले, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, तृतीय श्री. तेजस दिनकर पाटील , आप्पासाहेब जेधे महाविद्यालय,पुणे या सर्व विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.    
     
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष रो.संजयसिंह गायकवाड,सचिव रो.विमलकुमार बंब, संस्थेच्या सर्व शाखांचे प्रमुख, शिक्षक व प्रशासकीय सेवक सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार  डॉ. गिरीश मोरे यांनी मानले. तर उत्तम सूत्रसंचालन डॉ.माधवी सोळांकुरकर यांनी केले. सदर अनोख्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments