बाळासाहेब थोरातांची खुर्ची सोडायची तयारी; कुठे जाणार काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष पदाची वारी?


 खुर्ची कोणाला प्रिय नसते? त्यासोबत येणारे अधिकार आणि कर्तव्य दोन्हीचा स्वीकार करूनच, एखादी व्यक्ती त्या खुर्चीवर विराजमान होत असते. खुर्चीचा विषय आला की, राजकारण नेहमीच तापते. काँग्रेसमध्ये देखील असेच काहीतरी सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष पदावर असलेले बाळासाहेब थोरात पद सोडणार की नाही, यावर अनेक चर्चा रंगल्या आणि आता त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची तयारी दाखवली आहे. 

यानंतर, आता काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलासाठी वेगवेगळी खलबतं सुरू झाली आहेत. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्षपदाचा विडा कोण उचलणार? याकडे आता संपूर्ण जनतेचे लक्ष आहे. काँग्रेस प्रतिनिधींना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी तीन नाव सुचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे मतदान काँग्रेसच्या शक्ती ॲप द्वारे डिजिटली घेतले जाणार आहे. 

 दोन दिवस पक्षांतर्गत मंथन केल्यानंतर आता डिजिटल मदत घेण्याची तयारी सुरू झाली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एचके पाटील यांनी नुकताच महाराष्ट्रात येऊन काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांचा कल जाणून घेतला होता. आता ते सर्व नेत्यांना डिजिटल कॉल करून त्यांची मते जाणून घेत आहेत. महाराष्ट्रात  ५५७ प्रदेश प्रतिनिधी आहेत त्यापैकी आता कोणाला कोणाचे मत मिळते? प्रत्येकाच्या पसंतीक्रमानुसार कशी मतं नोंदवली जातात? आणि कोण प्रदेशाध्यक्ष होतो? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

का सोडत आहेत बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपद?

 बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद जाऊन जेमतेम दीड वर्ष झालं आहे. त्याचबरोबर सिएलपी, महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष तीनही पदांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. काँग्रेसमधील एक गट त्याबाबत मोहीम करताना समोर आला. याच कारणास्तव, आता बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Post a Comment

0 Comments