आजरा/प्रतिनिधी:
गेल्या महिन्यात उत्तूर येथील बातमीदार अशोक तोरस्कर यांच्या आई रुक्मीणी बापू तोरस्कर यांचे वयाच्या ८० वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. आईच्या दशक्रिया विधीनिमित्त विधीसाठी येणार्यांना आईची आठवण म्हणून वाचन चळवळीला प्रोत्साहन देणारा पुस्तक भेट देण्याचा उपक्रम राबविला. तब्बल २०० पुस्तकांची भेट देत 'वाचाल तर वाचाल' या संदेशाचे आवाहन करत पुस्तक रुपातून आईची आठवण जागवली. त्यांनी राबवलेल्या या आगळ्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
दशक्रिया हा हिंदू चालीरीतींनुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहाव्या दिवशी करण्यात येणारा विधी आहे. या दशक्रिया विधीसाठी परिवारातील सदस्य व अत्यंतजवळच्या नातेवाईकांना बोलवले जाते. मृत व्यक्तीची आठवण राहावी म्हणून पश्चिम महाराष्ट्रात अशा कार्याला उपस्थित राहणार्यांना भेटवस्तू दिली जाते. नेहमीची वापरण्याची वस्तू म्हणजे स्टीलची भांडी यामुळे अनेकजण भांड्यावर मृत व्यक्तीचे नाव टाकून स्मरणार्थ म्हणून देतात.
या अनेक दिवसापासून चालत आलेल्या पारंपारिक पद्धतीला फाटा देत पत्रकार अशोक तोरस्कार यांनी मातोश्री रुक्मीणी तोरस्कर यांच्या दशक्रिया विधीसाठी येणार्यांना वाचन चळवळीला प्रोत्साहन देणारा विधायक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला़. सोशल मिडियाच्या माऱ्यापुढे पुस्तकावर प्रेम करणारा वाचकवर्ग आजही टिकवून आहे. अत्यंत व्यस्त जीवनशैलीमध्ये अनेकजण नवनवीन पुस्तकांच्या शोधात असतात. एक भेट पुस्तक म्हणून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे अशोक तोरस्कर सांगतात.
तेराव्या दिनाचे औचित्य साधून काहीतरी भेटवस्तू देण्याची आपल्याकडे प्रथा आहे. यामुळे अनेकदा होत काय की गरजेच्या नसलेल्या भाड्यांचा अनावश्यक संचय होतो. त्यामुळे भांडी ही अनेकदा अडगळच अधिक वाटतात आणि विनावापरामुळे ज्या उद्देशाने भांडी भेट दिली जातात तो उद्देश साध्य होत नाही. डिजिटल युगात आजही पुस्तक वाचनाचे महत्त्व कायम आहे. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी हा उपक्रम मी आईच्या आठवणीसाठी राबविला आहे.
- अशोक तोरस्कर
0 Comments