प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी
इकॉनॉमिक अॅन्ड पॉलिटिकल विकली (इपीडब्लू) या प्रख्यात नियतकालिकाच्या गतवर्षीच्या पहिल्या पाच सर्वोत्कृष्ट संशोधक लेखकांच्या यादीत शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ. ज्ञानदेव तळुले यांचा समावेश झाला आहे.
इपीडब्लू ही नियतकालिका दरवर्षी देश-विदेशातून आलेल्या संशोधनात्मक शोधनिबंधाचा विविध निकषाच्या आधारावर अभ्यास करून टॉप फाईव्ह संशोधक लेखकांचा नावाचा गौरव करीत् असते. डॉ. तळुले यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांसंदर्भातील उच्चकोटीच्या संशोधनात्मक लिखाणामुळे व आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची वर्गवारी करून सरकारला योग्य त्या उपाययोजना कशा करता येतील अशा प्रकारचे रचनात्मक संशोधन त्यांनी केले आहे. त्यामुळे प्रा. तळुले यांच्या शोधनिबंधाचा इपीडब्लूच्या टॉप फाईव्हमध्ये गौरव करण्यात आला आहे.
प्रा. तळुले यांनी २००१ ते जुलै २०१८ या अठरा वर्षांच्या कालखंडातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची माहिती संकलित केली आहे. १५१९ आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे सर्वेक्षण केल्यानंतर हाती आलेल्या माहितीचे संशोधनात्मक पातळीवर पृथक्करण व् विश्लेषण करून त्या आधारावर त्यांनी विस्तृत संशोधनात्मक शोधनिबंध तयार केला. यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त यांच्याशी त्यांनी चर्चा केली. तसेच शेतकरी आत्महत्यांच्या मुख्य कारणांचा त्यांनी या माहितीच्या आधारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर काय उपाययोजना करता येतील याची मांडणीही त्यांनी या शोधनिबंधात शास्त्रशुद्ध पद्धतीने केली आहे. पंजाब, कर्नाटक आणि केरळमध्ये शेतकरी आत्महत्या रोखण्यास त्या त्या सरकारला यश आले आहे. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मात्र त्या होत आहेत. याच्या मुळाशी असलेल्या विविध कारणांचा परामर्श प्रा. तळुले यांनी घेतला आहे. त्यांचे हे संशोधन ‘इकॉनॉमिक अॅन्ड पोलिटिकल विकली’मध्ये प्रकाशित झाले. हाच शोधनिबंध सन २०१९-२०२० मधील सर्वोत्तम पाचमधील एक ठरला आहे.
प्रा.डॉ. ज्ञानदेव तळुले हे स्वतःच्या संशोधनात्मक कार्याबरोबर अर्थशास्त्र विभागाला संशोधनात्मक अधिविभाग म्हणून गौरव प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर असंख्य संशोधनात्मक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांचे इपीडब्लू’च्या टॉप फाईव्ह संशोधकातील् समावेशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments