संभाजी महाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल, तर दुसरं नाव सांगा चंद्रकांत पाटील यांचे अमोल मिटकरींना आवाहन


 
 मुंबई  : औरंगाबाद महापालिका निवडणूक नामांतराचा वाद काही शमताना दिसत नाही. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस पेटत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नामांतराच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांना सवाल केला होता. मिटकरींच्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी अमोल मिटकरीला थेट दुसरा सवाल करत  संभाजीमहाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल, तर दुसरं नाव सांगा, असे आवाहन केले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अहमदाबादच्या नावावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला आज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. आज झालेल्या पञकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले,”देशामध्ये परकीय आक्रमणाची जी खाणाखुणा असलेली नाव आहेत. ती बदला. अहमदाबादचे नाव बदला, उस्मानाबादचे पण बदला, माझी काहीच अडचण नाही, पण औरंगाबादचे नाव बदलायचे नाही असे तुम्ही ठरवत असाल, तर तुमचे औरंगजेबावर प्रेम आहे? संभाजी महाराजांवर नाही. संभाजीमहाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल, तर दुसरे नाव सांगा. औरंगजेबाचं नाव औरंगाबादला ठेवा कशासाठी?”, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

“अहमदाबादचे कर्णावती करायला माझी काहीच हरकत नाहीये. परंतु जिथे तुमची सत्ता आहे तिथली नाव आधी बदला ना… यांच्याकडे औरंगाबादचे संभाजीनगर करायची इच्छाशक्ती नाही. महाविकास आघाडीला केवळ महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करायचे आहे,” अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

Post a Comment

0 Comments