महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना कृती समिती, कामगार आयुक्त, उपायुक्त व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव यांची संयुक्त बैठक संपन्न!


शिरोळ/प्रतिनिधी:

बैठकीमध्ये बांधकाम कामगारांच्या मागण्या स्वीकारून त्याची पूर्तता करण्या संदर्भात कामगार आयुक्त श्री महेंद्र कल्याणकर यांनी बैठक घेऊन ठोस आश्वासन दिले आहे.त्यामुळे कामगार संघटना कृती समितीच्या वतीने ४ जानेवारी रोजी मुंबई बांद्रा ऑफिसवर  आयोजित करण्यात आलेला मोर्चा रद्द करण्याचा निर्णय उपस्थित कामगार संघटनांच्या प्रतिनिधीनी एकमताने घेतला.

जानेवारी २०२१ च्या तिसऱ्या आठवड्यामध्ये राज्यातील बांधकाम कामगारांचा कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कोल्हापूर मध्ये मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

३० डिसेंबर रोजी कामगार आयुक्त यांचे बांद्रा कार्यालयतील बैठकीसाठी निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने कॉ. शंकर पुजारी, स्वराज्य जनरल कामगार सेनेच्या वतीने श्री अमित कदम,महाराष्ट्र बांधकाम कामगार सेना वतिने राजेंद्र निकम, राष्ट्रवादी कामगार संघटना वतीने श्री मदन मुरगुडे ,महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना वतीने कॉ आनंद गुरव, सातारा क्रांती जनरल कामगार युनियन च्या वतीने कॉ विठ्ठल पिसाळ, लोकराज्य कामगार संघटना वतीने साथी मच्छिंद्र कांबळे, वायरमन असोसिएशन संघटना वतीने तानाजी तावडे,सातारा आयटक संघटना वतीने निलेश माने, ठाणे जिल्हा निवरा संघटना वतीने कॉ रमेश जाधव, पालघर जिल्हा आयटक संघटना वतीने कॉ सुनील पाटील इत्यादी बांधकाम कामगार नेते उपस्थित होते. बैठकीत शासनाच्या वतीने महाराष्ट्राचे कामगार आयुक्त श्री महेंद्र कल्याणकर, कल्याणकारी मंडळाचे सचिव श्रीरंगम्, कामगार पुणे विभाग उपायुक्त श्री पोळ, कामगार उपायुक्त  कोकण विभाग श्री कोकितकर,सहाय्यक कामगार आयुक्त श्री गुरव, सहायक कामगार आयुक्त श्री आयरे, सहायक कामगार आयुक्त श्री पाटणकर इत्यादी उपस्थित होते.

कार्यालयांमधील बैठकीमध्ये खालील मागण्यांची पूर्तता करण्याचे एकमताने ठरले. 

🔸बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी ५० हजार रुपये देण्याचा कल्याणकारी मंडळाने मंजूर केलेला प्रस्ताव शासनाकडे त्वरित निर्णयासाठी पाठवण्यात येईल.  

🔸३१ डिसेंबर २०१९ पूर्वी ज्या कामगारांनी अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी पाच हजार रुपये मिळण्यासाठी मागणी केली होती अशा पाच लाख बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये रक्कम तीन महिन्यात देण्यात येईल. 

🔸ऑनलाइन पद्धतीने सध्या सुरू असलेले नवीन नोंदणीचे काम, बांधकाम कामगारांच्या ओळखपत्राची नूतनीकरण व लाभ देण्याचे काम जलदगतीने ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर पूर्ण करण्यात येईल. बांधकाम कामगारांच्या घरांच्या साठी दोन लाख रूपये अनुदानाची तरतूद करण्यात आलेली असून त्यासाठी केलेल्या अर्जाची पूर्तता कामगारांनी त्वरित केल्यास त्याचाही लाभ देण्यात येईल. 

🔸ज्या बांधकाम कामगारांचे लोक डॉन मुळे ओळखपत्राचे नूतनीकरण झालेले नाही पण अशा मृत्यू पावलेल्या बांधकाम कामगारांना नुकसान भरपाई देणे बाबत कल्याणकारी मंडळांमध्ये निर्णय घेण्यात येईल. असे पत्रक महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेले आहे.

कॉ शंकर पुजारी, निमंत्रक, महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती

Post a Comment

0 Comments