IPL 2020: डेव्हिड वॉर्नरचा महापराक्रम



सनरायझर्स हैदराबादने  मंगळवारी मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का देत यंदाच्या आयपीएलमध्ये प्ले ऑफ प्रवेश निश्चित केला. प्ले ऑफ प्रवेश करण्यासाठी हैदराबादला हा सामना जिंकणे अनिवार्य होते. या धमाकेदार विजयासह हैदराबादने सलग पाचव्यांदा प्ले ऑफ फेरी गाठली असून अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा संघ ठरला आहे. हैदराबादच्या या यशामध्ये कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे योगदान मोलाचे ठरले असून त्याने आता असा एक विक्रम रचला आहे, जो अजूनपर्यंत कोणत्याही फलंदाजाला जमलेला नाही.

 
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स  , दिल्ली कॅपिटल्स, हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या चार संघांनी प्ले ऑफ फेरी गाठली आहे. वॉर्नरच्या तडाखेबंद नाबाद ८५ धावांच्या जोरावर मंगळवारी हैदरबादने मुंबईला १० गड्यांनी नमवले. यासह वॉर्नरने यंदाच्या सत्रात ५०० धावांचा पल्लाही पार केला. विशेष म्हणजे त्याने अशी कामगिरी तब्बल सहाव्यांदा केली असून आतापर्यंत त्याच्याशिवाय कोणालाही अशी कामगिरी करता आलेली नाही. 



हैदराबादकडून सलग सहावे सत्र खेळताना वॉर्नरने ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. २०१४ सालापासून वॉर्नरच्या या धडाकेबाज कामगिरीला सुरुवात झाली. २०१४ मध्ये ५२८ धावा फटकावल्यानंतर वॉर्नरने २०१५ साली ५६२ धावा केल्या. २०१६ साली हैदराबादने आयपीएल जेतेपद पटकावले. त्यामध्ये वॉर्नरचा सिंहाचा वाटा राहिला होता. या सत्रात त्याने तब्बल ८४८ धावा कुटताना संघाला जेतेपद पटकावून दिले होते. यानंतर त्याने २०१७, २०१९ आणि २०२० मध्येही ५०० धावांचा पल्ला पार केला.

यामध्ये अपवाद राहिला तो २०१८ सालाचा. चेंडू छेडछाड प्रकरणी वॉर्नरला २०१८ सालच्या सत्रात सहभागी होता आले नव्हते. मात्र यानंतर २०१९ मध्ये जबरदस्त पुनरागमन करताना त्याने ६९२ धावा चोपल्या होत्या. आयपीएलमधील यशस्वी फलंदाजांमध्ये गणना होत असलेल्या वॉर्नरने आतापर्यंत १४० सामन्यांतून ४३.२६च्या सरासरीने ५,२३५ धावा काढल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये ४ शतके आणि ४८ अर्धशतकेही झळकावली आहेत.

वॉर्नरने प्रत्येक वर्षी फटकावलेल्या धावा :

२०१४ : ५२८ धावा.

२०१५ : ५६२ धावा.

२०१६ : ८४८ धावा.

२०१७ : ६४१ धावा.

२०१९ : ६९२ धावा.

२०२० : ५१० धावा.

Post a Comment

0 Comments