✒️रोहिदास भोरकडे
काल आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आणि अखेर मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याच्या राजकीय तालमितील एक उत्कृष्ट वस्ताद हरवला असच म्हणावे लागेल, कारण ते प्रत्यक्ष एक कुस्तीतील पट्टीचे पहिलवान व वस्ताद होते. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत देखील जनसंपर्काच्या बळावरच विधीमंडळाच्या सदस्यत्वाची म्हणजेच आमदारकीची हॅटट्रिक मारली होती.
त्यांची ओळख जनसामान्यांचा लोकप्रिय नेता अशीच राहिली आहे. त्यांनी तालुक्याच्या राजकारणात १९९२ मध्ये सक्रिय सहभाग घेत, ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही निवडून आले. तेथून सुरु झालेल्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पुढे ते २००२ मध्ये याच कारखान्याचे अध्यक्षही झाले.
तेव्हापासून आजपर्यंत अध्यक्षपद राखत त्यांचंच या कारखान्यावर वर्चस्व राहिलं भारत भालके सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले. मात्र या तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले.
सन २००९ मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला आणि ते राजकारणातील जायंट किलर ठरले. २०१९ मध्ये त्यांनी माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला. विशेष म्हणजे २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
खरंतर त्यावेळी ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ऐनवेळी भारत भालकेंनी ‘डब्ल्यू’ टर्न घेत कमळ हाती घेता-घेता अचानक राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ हाती बांधलं होतं.
२०१९ मध्ये भारत भालके यांनी काँग्रेसला अनौपचारिक रामराम ठोकल्यावरही भाजपकडून त्यांना होल्डवर ठेवण्यात आलं होतं. मात्र विधानसभेच्या तोंडावर सावध निर्णय घेत भालके यांनी भाजपऐवजी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेण्याचं ठरवलं.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत निवडणुकांना सामोरं जाणार असल्याने पंढरपूरच्या जागेवरुन तणातणी होण्याची शक्यता कमीच होती.दुसरीकडे भाजप-शिवसेनेचा तोपर्यंत युतीचा निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे युती झाल्यास शिवसेनेकडून माढा ऐवजी पंढरपूरची जागा भाजपला सुटणार का, या द्विधा मनस्थितीत आमदार भारत भालके होते.
युतीची घोषणा तोपर्यंत झाली नसल्याने भाजपच्या पक्षनेतृत्वाने भालकेंना होल्डवर ठेवलं होतं, त्यामुळे भालकेंची धाकधूक वाढली होती.
आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत भालके यांच्या घरी फराळाचा आस्वाद घेतल्यानंतर भालके यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. मात्र त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर करुन या चर्चांना पूर्णविराम दिला आणि २०१९ ची विधानसभेच्या निवडणुकीत ते विजयी होऊन पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले. हीच त्यांच्या आमदारकीची हॅटट्रिकी ठरली. आशा प्रकारे ते एक उत्कृष्ट असे राजकीय वस्ताद ठरले यात काही शंका नाही.
0 Comments