आयपीएल मॅचेसवर अवैध पद्धतीने सट्टा चालवणाऱ्या काही जणांना सोलापूर शहर गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सोलापूर शहर गुन्हे शाखेने नागपुरात जाऊन आणखी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. ६ नोव्हेंबर रोजी सोलापुरातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आयपीएल सट्टा चालवत असल्याप्रकरणी ताब्यात घेतलं होतं.
त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील कलबुर्गी येथून १० नोव्हेंबर रोजी आणखी दोघांना ताब्यात घेतलं. अटक केलेल्या या चार ही आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, या सट्टा प्रकरणाचे धागेदोरे नागपूर पर्यंत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.
त्यानुसार सोलापूर शहर गुन्हे शाखेचे एक पथक मागील ४ दिवसांपासून नागपूरमध्ये थांबून होते. खबऱ्यांमार्फत आरोपीचा सुगावा लागताच वरीष्ठ अधिकाऱ्यांसह दुसरे पथक देखील नागपूरला रवाना झाले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड रोडवरील एका फार्महाऊसवर पोलिसांना छापा टाकत सट्टा प्रकरणातील मुख्य संशयित बुकी रिंकु उर्फ अमित अग्रवाल, सुनील शर्मा, राहूल काळे या तिघा आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून सट्ट्यासाठी वापरलेले लॅपटॉप, मोबाईल आणि इतर मुद्देमाल देखील पोलिसांना जप्त केल्याची माहिती आहे.
0 Comments