पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझच्या उपाध्यक्ष मरियम नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आता मरियम शरीफ यांनी असं म्हटलं आहे की इम्रान खान हे इतके घाबरले होते की त्यांनी माझ्यावर तुरुंगातही असतानाही नजर ठेवली होती.
एवढंच नाही तर बाथरुममध्येही छुपे कॅमेरे बसवले होते. पाकिस्तानचं सरकार हे महिला विरोधी सरकार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यावेळी तुरुंगात असताना तिथेही नजर ठेवण्यात आली आणि बाथरुममध्ये छुपे कॅमेरे लावले गेले होते असा आरोप आता मरियम यांनी केला आहे.
“मी दोनदा तुरुंगात गेले, या काळात एका महिलेला तुरुंगात मिळालेली वागणूक ही अत्यंत हीन आणि घृणास्पद होती. सरकारला त्यांचे तोंड दाखवण्याचीही लायकी राहिली नाही” असंही त्या म्हणाल्या.
“एका पक्षाच्या उपाध्यक्षपदी असलेल्या महिलेला जर घरी येऊन त्यांच्या वडिलांसमोर अटक केली जात असेल तर पाकिस्तानात कोणतीही महिला सुरक्षित नाही. पाकिस्तान असो किंवा जगातला कोणताही देश कुठेही महिला कमकुवत नाहीत हे इम्रान खान सरकारने विसरु नये” असंही मरियम म्हणाल्या.
मरियम नवाझ यांनी इम्रान सरकारवर गंभीर आरोप केला आहे. जर मरियम नवाझ यांच्या घराचा दरवाजा तोडला जाऊ शकतो.जर खरं बोलण्यासाठी मरियम नवाझला तिच्या वडिलांसमोर अटक केली जाऊ शकते तर काहीही घडू शकतं. मला तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी माझ्या बाथरुममध्ये छुपे कॅमेरे लावण्यात आले होते. अशा सगळ्या परिस्थितीत पाकिस्तानात महिला सुरक्षित आहेत असं कसं म्हणता येईल? असंही मरियम नवाझ यांनी म्हटलं आहे.
0 Comments