गाडेगांव ग्रामपंचायतीचा घरकुल योजनेतील गैरप्रकार उघडकीस


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालयक्यातील गाडेगांव येथील ग्रामपंचायतीने रमाई घरकुल योजना व इंदिरा आवास योजना वाटपात व विना परवाना बांधकामाबाबत केलेला गैरप्रकार अखेर उघडकीस आला असून, संबंधित लाभार्थी, सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अमोल भालके यांनी केली आहे.

ग्रामपंचायतीने रमाई व इंदिरा आवास योजनेत गैरप्रकार करुन एकाच घरात दोन व्यक्तींना लाभ दिला असून, पूर्वी बांधलेल्या इंदिरा आवास योजनेतील घरकुल सुस्थितीत असताना त्या जागेवर नवीन इंदिरा आवास योजनतील घरकुल बांधून शासनाच्या योजनेचा अवमान केला असल्याचे आढळून आले आहे. अमोल भालके यांनी अतिक्रमण झाले असल्याचा अर्ज ग्रामपंचायतीकडे दिला असता सरपंच, ग्रामसेवक यांनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यावर अमोल यांनी पंचायत समितीकडे दाद मागितली असता पंचायत समितीने सदर प्रकरणाची चौकशी करत विस्तार अधिकारी सज्जनराव जाधव यांनी त्यांच्या चौकशी अहवालात सदर बांधकाम अतिक्रमण असल्याचा अहवाल पंचायत समितीकडे दाखल केला आहे. असे असूनही ग्रामपंचायत या गंभीर गोष्टीकडे लक्ष देत नाही. त्यामुळे अमोल भालके यांनी पुढील कारवाईसाठी गटविकास अधिकारी बार्शी, तहसिलदार बार्शी, जिल्हाधिकारी सोलापूर,  मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्याकडे दाद मागितली आहे.

सदरील प्रकरणात गाडेगांव ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने रमाई व इंदिरा आवास योजनेत गैरप्रकार करत शासनाची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सदरील प्रकरणात लाभार्थीसह सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी तक्रारदार अमोल भालके व गाडेगांव येथील या योजनेपासून वंचित असलेल्या गाडेगांवमधील ग्रामस्थांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments