कोल्हापूर/प्रतिनिधी :
गेल्या १२ वर्षात पदवीधर मतदार संघातील प्रश्नांची काहीच सोडवणूक झाली नाही. प्रश्न आहे तसेच प्रलंबित आहेत. पदवीधर मतदार संघाचे आमदार असताना चंद्रकांत पाटील काय गोट्या खेळत होते काय ? अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आज शनिवारी कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये महाविकास आघाडीतर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
(Advertise)
पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला.
पुढे बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकाने अनेक योजनांची अंमलबजावणी केली. त्यामुळे हे सरकार पुढील २५ वर्ष चालणार असा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, हे दोन्ही उमेदवार सक्षम,अभ्यासू ,आणि प्रश्नांची सोडवणूक करणारे आहेत. त्यामुळे पुढील आठ दिवसांत महत्वाची जबाबदारी असणार आहे. सर्व जण ताकदीने प्रयत्न करणार असून या दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना जयंत आसगावकर म्हणाले, शिक्षक मतदार संघाचे अनेक प्रश्न गेले कित्येक वर्ष प्रलंबित आहेत. याआधी निवडून गेलेल्या उमेदवारांनी फक्त स्वतःचा फायदा केला.हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठीच आपण ही निवडणूक लढवत असून सगळ्यांच्या पाठींब्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना अरुण लाड म्हणाले, मागील आमदारांनी समस्या जाणूनही घेतल्या नाहीत आणि त्याची सोडवणुकही केली नाही. सगळ्यांनाच आता बदल हवा आहे म्हणूनच आपला विजय निश्चित आहे
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार पी.एन.पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी आपल्या भाषणात महाविकासआघाडीच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, निवडणुकीत माघार घेऊन महाविकास आघाडीला पाठींबा दिल्याबद्दल प्रताप उर्फ भैया माने, दादा लाड,बाबा पाटील, खंडेराव जगदाळे यांचे सत्कार जलसंपदा मंत्री जयंत पाटील व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हातात हात घेत आपला विजय निश्चित आहे असा विश्वास दाखवला.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव आमदार राजू आवळे, आमदार राजेश पाटील, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील,अरुण दुधवडकर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे माजी आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments