सेवा निवृत्तीधारकांना डाक विभाग देणार हयातीचा दाखला


 डाक विभागामार्फत नागरिकांसाठी विविध योजना कार्यरत असून, आता केंद्र व राज्यशासकीय सेवानिवृत्तीधारकांना आवश्यक असणारा हयातीचा  दाखला  डाक विभागामार्फत देण्याची व्यवस्था करण्यात आली  असल्याची माहिती पंढरपूर विभागाचे डाकघर अधिक्षक एन.रमेश यांनी दिली.

केद्र व राज्यशासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी शासनाकडून सेवानिवृत्ती वेतन मिळते. सर्व सेवानिवृत्तीधारकांना हयात असल्याबातचा दाखला संबधित विभागाकडे जमा करावा लागतो. यासाठी पेन्शनधारकांना महाईसेवा केंद्र, आपले सरकार आदी  ठिकाणाहून  दाखला तयार करुन तो संबधितांकडे जमा करावा लागतो.  डाक विभागामार्फत सेवानिवृत्त पेन्शनधारकांना जवळच्या पोस्ट ऑफिस अथवा मागणी केल्यास पोस्ट कर्मचाऱ्यांमार्फत घरी येवून  दाखला देण्यात येणार आहे. आधार प्रणालीव्दारे  ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, यासाठी पेन्शन ओळखपत्र, पेन्शन पेमेंट ऑर्डर, पेन्शन मंजूरी व वितरण विभागाचे नांव, बँक खाते, भ्रमणध्वनी क्रमांक तसेच  आधार क्रमांक आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. सर्व सेवानिवृत्त पेन्शनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे, आवाहनही   एन.रमेश यांनी केले आहे.

खंडित टपाल जीवन विमा पॉलिसीचे पुनर्जीवन करण्यास मुदतवाढ

भारतीय डाक विभागांतर्गत असलेल्या टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेतील विविध पॉलिसी पैकी ज्या पॉलिसी सतत पाच वर्ष भरणा न केल्यामुळे बंद पडल्या आहेत. त्या विमा पॉलिसींना पुनर्जीवित करण्यासाठी  ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती डाकघर विभागाचे अधिक्षक एन. रमेश यांनी दिली.

पोस्ट ऑफिस लाइफ विमा नियम २०११ च्या अटी व शर्ती मध्ये केलेल्या दुरुस्तीच्या अनुषंगाने टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा पॉलिसी धारकांनी सतत पाच वर्षे भरणा न केल्यामुळे पॉलिसी बंद पडल्या असतील तर त्यांचे पुनर्जीवन ३१ नोव्हेंबर २०२० पर्यंत करण्यात येणार आहे.तदनंतर कोणत्याही पॉलिसीचे पुनर्जीवन करता येणार नाही त्या नियमानुसार रद्द समजण्यात येतील असेही, अधिक्षक एन. रमेश यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments