करमाळा/प्रतिनिधी:
करमाळा तालुका उसाचे आगार म्हणून ओळखला जातो. करमाळा तालुक्यातील साखर कारखान्या बरोबरच शेजारील पुणे व नगर जिल्ह्यातील साखर कारखाने या भागातून मोठ्या प्रमाणावर ऊस नेतात. सध्या ऊसतोड हंगाम चालू असल्याने उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रक यांच्याद्वारे मोठ्या प्रमाणावर उसाची वाहतूक चालू आहे. यापैकी अनेक ट्रक व ट्रॅक्टर रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक करतात मात्र हे करत असताना त्यांच्या ट्रेलरला रिप्लेक्टर बसवलेले नाहीत, त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना पुढील ट्रेलर अजिबात दिसत नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. याशिवाय अनेक ट्रेलर पासिंग नाहीत त्यांचे आरटीओकडून पासिंग झालेले नाही.
ज्या टेलरची ऊस वाहून नेण्याची क्षमता आठ टन इतकी आहे ते ट्रेलर १४ टन एवढा प्रचंड ऊस भरतात. सरासरी दोन्ही ट्रेलरचे वजन २५ ते २६ टन तर काहींचे ३२ टनापर्यंत जाते .जास्त ऊस वाहून नेण्यासाठी वाहनचालकांमध्ये स्पर्धा लागलेली असते. यामुळे अगोदरच खराब झालेल्या रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
याशिवाय ऊस खाली करून परत येत असताना त्यांच्यात वेगाची स्पर्धा लागलेली असते. त्यामुळे ते अतिशय वेगात वाहन चालवतात, पैकी अनेक ट्रॅक्टर ड्रायव्हर कडे वाहन चालवण्याचा परवाना नाही. १८ ते २० व त्यापेक्षाही कमी वयोगटातील ही मुले अतिशय कमी पगारात नोकरी करतात म्हणून वाहनमालक त्यांना कामावर ठेवत आहेत.
रात्री दिवसा कधी वाहन भरून जाताना किंवा येताना हे चालक फार मोठ्या प्रमाणावर टेपरेकॉर्डर चा कर्णकर्कश आवाज सोडतात. त्यामुळे त्यांना पाठीमागून आलेले वाहन कळत नाही .पाठीमागून येणाऱ्या वाहनाने कितीही मोठ्याने हॉर्न वाजवला तरी त्याचा आवाज टेप रेकॉर्डर मुळे त्यांना ऐकू येत नाही. त्यामुळे त्यांचे लक्ष नसते. काही चालक तर दारू पिऊन ट्रॅक्टर चालवतात असे लोकांच्या निदर्शनास आले आहे.
ट्रॅक्टर ला मोठ्या प्रमाणात केलेले डेकोरेशन व हेडलाईट यामुळे चालकांना पुढचे दिसत नाही. अतिशय आशील व इरसाल अशी गाणी लावून हे लोक मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक शांततेचा भंग करीत आहेत. गावातील लोकांनी जर यांना विचारले तर त्यांचे मालक संबंधित ठिकाणी येऊन दादागिरी व अरेरावीची भाषा करतात .यामुळे रस्त्यालगत असलेल्या गावांमधील लोक मोठ्या प्रमाणावर हैरान झाले आहेत.
या भयंकर आवाजाचा त्रास लहान मुले व वृद्ध नागरिक, आजारी माणसे व अभ्यास करणारे विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक गावात रस्त्याच्याकडेला प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, दवाखाने यासारखी ठिकाणी आहेत यांना याचा फार मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
तरी पोलीस प्रशासन संबंधित कारखाने व ग्रामपंचायत यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन असे प्रकार थांबवावेत अशी मागणी जनतेकडून होत आहे.
0 Comments