बिहारमधील निकाल हा लोकशाहीचा कौल आहे व तो मानावाच लागेल. तेजस्वी यादव पराभूत झाले असे मानायला आम्ही तयार नाही. निवडणूक हरणे हाच फक्त पराभव नसतो आणि जुगाड करून आकडा वाढवणे हा विजय नसतो. तेजस्वीची लढाई म्हणजे मोठा संघर्ष होता.
हा संघर्ष कुटुंबातला होता तसा समोरच्या बलाढ्य सत्ताधाऱ्यांशी होता. तेजस्वीची कोंडी करण्याची व बदनामी करण्याची एकही संधी दिल्ली व पाटण्याच्या सत्ताधाऱ्यांनी सोडली नाही. ‘जंगलराजचे युवराज’ अशी निर्भत्सना पंतप्रधानांनी करूनही तेजस्वीने संयम ढळू दिला नाही व लोकांत जाऊन ते प्रचार करीत राहिले.
नितीशकुमारांना पराभवाची चिंता एवढी वाटली की, ही माझी शेवटची निवडणूक असल्याच्या विनवण्या त्यांनी शेवटच्या टप्प्यात केल्या. तसे भावनिक आवाहन त्यांना करावे लागले. पंधरा वर्षे बिहारवर एकछत्री राज्य करणाऱया नितीशकुमारांवर ही वेळ तेजस्वी यादव यांनी आणली. कारण या तरुण मुलाने निवडणूक प्रचारात विकास, रोजगार, आरोग्य, शिक्षण हे मुद्दे आणले जे आधी साफ हरवले होते. बिहारची निवडणूक रंगतदार झाली. त्यात रंग भरण्याचे काम तेजस्वी यादवने केले.
पंतप्रधान मोदी या बलदंड नेत्यासमोर व बिहारमधील सत्ताधाऱ्यांच्या झुंडशाहीसमोर तो थांबला नाही व अडखळला नाही. याची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात राहील. बिहारची सूत्रे कुणाच्या हातात जायची ते जातील, पण बिहारच्या निवडणुकीने देशाच्या राजकारणाला तेजस्वी नावाचा मोहरा दिला आहे. त्याच्या लढ्याचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच,” असं म्हणत शिवसेनेनं तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं आहे.
0 Comments