IPL 2020: विराटच्या नावे नव्या विक्रमाची नोंद


आयपीएलच्या ४४व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव केला. बंगलोरने २० षटकांत १४५ धावा केल्या. बंगलोरने दिलेलं लक्ष्य चेन्नईने १८.१ षटकात पूर्ण केलं. सामन्यात आरसीबीकडून कर्णधार विराट कोहलीने ४३ चेंडूत ५० धावा केल्या. कोहलीने आपल्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार लगावला. यासह त्याने आयपीएलमध्ये एक मोठा विक्रमही आपल्या नावे केला.

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं आपल्या आयपीएल कारकीर्दीतला २०० वा षटकार ठोकला. रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर पुढे सरसावत विराटनं हा विक्रमी षटकार ठोकला. अशी कामगिरी करणारा विराट हा आजवरचा पाचवा खेळाडू ठरला आहे तर तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर विराट कोहलीने ही कामगिरी केली. कोहलीच्या आधी या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश आहे. रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत २०९ तर धोनीने २१६ षटकार लगावले आहेत.

आयपीएलमधील सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत ३३६ षटकार ठोकले आहेत. त्याच्यापाठोपाठ आरसीबीच्या एबी डिव्हिलियर्सने ३२१ षटकार ठोकले आहेत.

बंगलोर हिरव्या जर्सीत मैदानात

विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ आज हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरला. आयपीएलच्या मैदानात दरवर्षी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी बंगलोरच्या संघातील खेळाडू एका सामन्यात ही हिरवी जर्सी परिधान करतात. यंदाही बंगलोरनं चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ही परंपरा कायम राखली.

Post a Comment

0 Comments