शिक्षकांना १ ते २० नोव्हेंबरदरम्यान दिवाळीची सुट्टी द्यावी...


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा प्रत्यक्षात बंद असल्या, तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. एप्रिल, मे महिन्यापासून ऑनलाईन शिक्षण सुरू असून विद्यार्थी आणि शिक्षकांना गणेशोत्सवाचीही सुट्टी देण्यात आली नाही. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक तणावाखाली असल्याने शिक्षण विभागाने दिवाळी सुट्टी १ नोव्हेंबर ते २०  किंवा २१ पर्यंत जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने (मुंबई) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एप्रिल २०२० पासून पूर्ण उन्हाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहिले. दर वर्षी परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी देण्यात येते; परंतु यंदा परीक्षांपूर्वीच लॉकडाऊन जाहीर झाल्याने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्गात पाठविण्यात आले. या कालावधीतही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरूच होते. गेले सहा ते सात महिने ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. या कालावधीत विद्यार्थी, शिक्षकांना कोणतीही मोठी सुट्टी मिळालेली नाही. परिणामी विद्यार्थी, पालक, शिक्षक तणावाखाली आहेत. शिक्षण विभागाने गणपती सुट्टीचीही तारीख शाळांना कळवली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांसाठी शिक्षण विभागाने दिवाळी सुट्टीची तारीख कळवावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. 

Post a Comment

0 Comments