मोठ्या भावाने किरकोळ मारहाण केली म्हणून रागातून भावानेच केला भावाचा खून


 
सोलापूर : वाईट संगती मधील मुलांसोबत का फिरतोस असे म्हणत मारहाण केलेल्या, मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी बट घालून खून केल्याप्रकरणी लहान भावा विरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राकेश मारुती बनसोडे (वय २३ रा. तक्षशिला नगर, बुद्ध विहाराच्या पाठीमागे कुमठा नाका) असे गुन्हा दाखल झालेल्या लहान भावाचे नाव आहे. दरम्यान राकेश बनसोडे हा सायकल वरून पळून जात होता, त्याला जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करणा-या पोलिसांनी पकडले.

या प्रकरणी सुरज कसबे याने फिर्याद दिली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके करीत आहेत.

मयत रोहित मारुती बनसोडे (वय २५) याने दि. ४ आॅक्टोंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरामध्ये लहान भाऊ राकेश बनसोडे याला तू वाईट संगतीमधील मुलांसोबत का फिरतोस, असे म्हणत मारहाण केली होती.

त्यावेळी राकेश बनसोडे हा तू मला मारतो काय ? मी तुला बघून घेतो असे म्हणून घरातून निघून गेला होता. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास सुरज विजय कसबे (वय २३) हा घरी आला, दार आतून बंद होते. त्यामुळे त्याने घरावर तोडून हवा येण्यासाठी मोकळे सोडलेल्या पत्र्याच्या फटीतून घरात प्रवेश केला.

रोहित बनसोडे हा किचन रूममध्ये अंधारात पांघरून घेऊन झोपलेला त्याच्या निदर्शनास आले. झोपण्यासाठी चादर शोधत असताना ती न मिळाल्याने सुरज कसबे हा किचन रूममध्ये गेला. लाईट लावून पाहिले असता रोहित बनसोडे यांच्या अंगावर दोन चादरी दिसल्या, त्यातील एक चादर काढून घेत असताना तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसून आला. हा प्रकार पाहून त्याने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी येऊन पाहणी केली, त्यानंतर त्याचा भावासोबत वाद झाला होता, अशी माहिती मिळाली.

Post a Comment

0 Comments