अमरावतीसह राज्यातील खरेदी विक्री संघाचे कमिशन आणि हमालांचा मोबदला तातडीने द्यावा : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले



अमरावती जिल्ह्यासह राज्यातील खरेदी विक्री संघाचे तूर व हरभरा खरेदीचे कमिशन आणि हमालांचा मोबदला पुढील आठ दिवसांत तातडीने देण्यासंदर्भात कार्यवाही करून शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे. याचबरोबर सहकारी संस्थांच्या माध्यमातूनच भविष्यात खरेदी-विक्री  करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

 आज विधानभवनात खरेदी विक्री संस्थांचे तूर, हरभरा खरेदीतील एक टक्के कमिशन वेळेवर अदा करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले बोलत होते. या बैठकीस महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार बळवंत वानखेडे, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दवानंद पवार, पणन विभागाचे अवर सचिव सुनंदा घड्याळे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव आदीसह नाफेड , मार्केटींग फेडरेशन, पणन महासंघाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
________________________________________
📢
(Advertise)
__________________________________________

 विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या प्रक्रियेस प्राधान्य देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना धान्याच्या मालाचा परतावा वेळेवेर न मिळाल्यास पुढील वर्षी पीक उत्पादनास त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गोदामात माल गेल्यावर चलन पावती मिळाल्यानंतर पैसे देण्याच्या प्रक्रियेस विलंब होतो आणि यामुळे शेतकऱ्यांचे एकप्रकारे शोषण होत असल्याचे दिसून येते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या खरेदी-विक्री व परतावा या  प्रक्रियेस गती मिळणे अत्यावश्यक असून, दरवर्षीचे जे कमिशन देय आहे, त्याप्रमाणे आजतागायतचे शेतकऱ्यांची देय रक्कम आणि हमालाचे मोबदला आणि यंदाच्या वर्षीची तफावत तातडीने आठ दिवसात अदा करण्यात यावे.  तसेच यावर्षीच्या हंगामात तात्काळ सर्व खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, असेही नाना पटोले म्हणाले.

खाजगी संस्थांना प्राधान्य देऊन सहकारी संस्थांसाठी अडचणी निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना संरक्षण देणे अत्यावश्यक असल्याने भविष्यात सहकारी संस्थांच्यावतीने यापुढे खरेदी-विक्री करण्यास प्राधान्य द्यावे अशा सुचनाही अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिल्या.

Post a Comment

0 Comments