बार्शी/प्रतिनिधी:
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. ज्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. जिल्ह्यातील ३.८१ लाख हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीपोटी ३३५ कोटी तर जमीन खचणे, वाहून जाणे व गाळ साचल्याने २ हजार ७५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पोटी ८.५३ कोटीची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील पिकांसह इतर नुकसानीपोटी ४८२ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. १४ ते १६ ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 3 लाख ८१ हजार ४६२ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यामध्ये ३ लाख १३ हजार ८१० हेक्टरवरील जिरायती व आठमाही बागायती पिकांचे तर ६७ हजार ६५१ हेक्टरवरील बारमाही पिकांचे नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बागायत आणि जिरायत पीक क्षेत्राला १० हजार रुपये तर फळपिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई देण्याची घोषणा केलीय. राज्य शासनाने जाहिर केलेल्या निकषांनुसार ४८२ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. केंद्राच्या नियमांनुसार जिरायत आणि बागायत जमीनीसाठी ६ हजार ८०० रुपये प्रतिहेक्टर तर फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर मदत मिळते. केंद्राच्या या निकषानुसार जिल्ह्यातील बाधित क्षेत्रासाठी ३३५ कोटी रुपयांची मदत मिळू शकते. तसा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्राकडे पाठवला जाईल.
जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान बार्शी तालुक्यात
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान हे बार्शी तालुक्यात झाले आहे. एकट्या बार्शी तालुक्यात ६८ हजार ८६८ हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले आहे. त्यांनतर पंढरपूर तालुक्यात ६५ हजार हेक्टर, अक्कलकोट तालुक्यात ४३ हजार ५२४ हेक्टर, सांगोला २६ हजार ७६६ हेक्टर, माढा ४३ हजार ९१२ हेक्टर, मोहोळ २७ हजार १३६ हेक्टर, मंगळवेढा ३१ हजार ५०३ हेक्टर, माळशिरस १६ हजार १६९०९ हेक्टर, दक्षिण सोलापूर २१ हजार ६०० हेक्टर, उत्तर सोलापूर १८ हजार १२ हेक्टर तर करमाळ्यात देखील १८ हजार २३० हेक्टर पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात बाधित झालेल्या पीकांमध्ये सर्वाधिक फटका हा तूर, ऊस आणि सोयाबीन पीकाला बसला आहे. एकूण बाधित क्षेत्रापैकी ५९ हजार ८४८ हेक्टर क्षेत्र हे तूर, ५४ हजार ७०५ हेक्टर ऊस तर सोयाबीनचे ४८ हजार ५२५ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. त्यानंतर ३८ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रातील डाळिंब, ३४ हजार 7७६८हेक्टर क्षेत्रातील मका, १६ हजार २४० हेक्टर क्षेत्रातील द्राक्षे आणि ५ हजार ५२२ हेक्टर क्षेत्रातील केळीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक रविंद्र माने यांनी दिली.
0 Comments