"महापूर अनुदान घोटाळाच्या पार्श्वभूमीवर 'आंदोलन अंकुशचा शिरोळ' तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा"

:



प्रा. डॉ. प्रभाकर माने/शिरोळ प्रमुख प्रतिनिधी:

     ऑगस्ट २०१९ मधील महापूर काळातील झालेले बोगस पंचनामे आणि बोगस लाभार्थी यांच्यावर कारवाई व्हावी व शिरोळ तालुक्यात तब्बल १०० कोटी पेक्षा जास्त रुपयांचा 'महापूर अनुदान घोटाळा ' झाला आहे. या अनुदान घोटाळ्याची संपूर्ण शिरोळ तालुक्यातील ४२ गावांची चौकशी करावी तसेच कवठेगुलंद व शेडशाळ या दोन गावातील घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्या तलाठी व ग्रामसेवक यांना तातडीने सेवेतून बडतर्फ करावी या मागणीसाठी "आंदोलन अंकुश " या संघटनेच्या वतीने नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरावरती मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र कोव्हीड - १९ ही पार्श्वभूमी आणि कायदा-सुव्यवस्था याचे कारण पुढे करत पोलिसांनी हा मोर्चा जयसिंगपूरातील दसरा चौकातच अडविला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता.     
        यावेळी जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष मा.श्री संजय पाटील यड्रावकर यांनी दसरा चौकात प्रत्यक्ष जाऊन आंदोलकांच्या भूमिका समजावून घेत या घोटाळ्याची चौकशी संदर्भात मंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून, ज्यांनी चुकीचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि जे खरे लाभार्थी असून ते मात्र वंचित असतील त्याचा लाभ त्यांना मिळेल असे आश्वासित करण्यात आले.
       मात्र शिरोळच्या तहसीलदार सौ.अपर्णा मोरे -धुमाळ यांनी आंदोलकांच्या भूमिकेला जोरदार विरोध केला.त्यामुळे जोपर्यंत महापूर अनुदान घोटाळ्याची चौकशीची घोषणा होत नाही तो पर्यंत तहसीलदाराच्या दारातून उठणार नाही,आम्ही बेमुदत आमरण उपोषण करू अशी भूमिका आंदोलन अंकुशचे प्रमुख, धनाजी चुडमुंगे,राजेश जगदाळे यांच्यासह उपस्थित आंदोलकांनी कठोर भूमिका घेत तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. यामध्ये आंदोलन अंकुशचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.

Post a Comment

0 Comments