"लोकवार्ता डिजिटल न्युज पोर्टल परिवाराच्यावतीने निर्भीड पत्रकार बाळ बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली "

प्रा.डॉ.प्रभाकर माने /शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी

जयसिंगपूर शहरातील ज्येष्ठ व निर्भीड पत्रकार, साहित्य निर्मिती विश्व व चळवळीचे खंदे समर्थक  बाळ बाबर यांची प्राणज्योत मालवली. बाळ बाबर हे एक असं व्यक्तिमत्व होतं की शिरोळ तालुक्यातील कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक अशा सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारे व प्रत्यक्षात कार्य करणार हे व्यक्तिमत्व होय. अत्यंत वक्तशीर व उत्तम वक्तृत्व कला यामुळे अनेक लोक त्यांचे अनुयायी झाले होते. आजपर्यंत त्यांनी  विविध कार्यक्रमांमध्ये  आपल्या  मधुर वाणीने हजारो सूत्रसंचालन उत्तम पद्धतीने पार पाडली. याचे कौतुक ही अनेक मान्यवर लोकांनी केले. उत्तम सूत्रसंचालन व बाळ बाबर असं एक उत्तम समीकरण तयार झाले होते.त्यांनी अनेक नवोदित वक्ते व  सूत्रसंचालकांना ते सातत्याने  मार्गदर्शन करीत असे.
    
 कविता, लोककथा,  लोकसाहित्य व साहित्यलेखन यामध्ये स्वतःला मनापासून वाहून घेतले. त्यांचा ' बाजार' या नावाने काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. सन २००७ मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात 'पत्रकारिता व विद्यार्थी' या विषयावर केलेले उत्तम भाषण आम्हा सारख्या विद्यार्थ्यांना आजही  प्रेरणा देण्याचे काम करते. त्याचबरोबर जांभळी येथील एनएसएस शिबिरात त्यांनी सांगितलेली लोककथा व कविता या  आजही आठवतात. विद्यार्थी हा वाचन चळवळीशी जोडला पाहिजे यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असत.त्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर शिरोळ तालुक्‍यातील प्रत्येक शाळा व कॉलेजमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन तसा प्रचार व प्रसार केला. हे  वाचन संस्कृती टिकवण्याचा उत्तम कार्य आजच्या काळात कौतुकास्पद आहे. त्यांचे  लोकसाहित्य, असंख्य कविता व लेख प्रसिद्ध झाले. त्यांनी आपले  आयुष्य हे साहित्यक चळवळीसाठी खर्ची घातले.
       
पत्रकार म्हणून त्यांनी आपलं करिअर निवडले पण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत एक समाजशील ,उत्तम व निर्भीड पत्रकार या नात्याने लेखणीची आपली नाळ जोडली व अभ्यासपूर्ण वैचारिक लेखांची मांडणी केली. कधीही लेखणी सामाजिक आंदोलनाच्या बाजूने तर कधी वंचित घटकाला न्याय देण्यासाठी सातत्याने लिहीत होती.खरं म्हणजे जयसिंगपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार म्हणून व त्यांच्या कार्याची सिद्धि पाहून असंख्य पत्रकार बंधु त्यांच्यावर बाबा या नात्याने प्रेम करीत असे किंबहुना  आदर्शवादी पत्रकार म्हणून आपली ओळख निर्माण केली. आजही त्यांच्या पश्चात अनेक पत्रकारांना ते दीपस्तंभासारखे वाटतात.त्यांनी जवळपास तीस वर्षांपेक्षाही अधिक पत्रकारितेच्या विश्वात सामाजिक बांधिलकी जपणारा पत्रकार म्हणून उत्तम कार्य केले आहे. शेवटी एका महिन्या मागे त्यांनी एका आध्यात्मिक केंद्राच्या निर्मितीसाठी आवश्यक  ती मदत पत्रकार म्हणून करण्याचा प्रयत्न केला. परंतु काळाने त्यांच्यावर मात केली. अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्वास " लोकवार्ता डिजिटल न्यूज पोर्टल " च्या वतीने  भावपूर्ण श्रद्धांजली व स्मृतीस अभिवादन ।

Post a Comment

0 Comments