तिचे थांबणे ....



अमृता राजेंद्र घाटगे

'ती' तिला काय कळत? तिला जमणारच नाही? तिला काय येत तेव्हा? अशा अनेक दुषणे तिला दिली जातात.... पण अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कधी कुणी शोधायचा प्रयत्न केला,  तिचे दररोजचे वेळ कसा जातो...ती घरी काय करते याचा विचार कुणी केला आहे ...काहीच न करता ती थांबली तर काय होईल.....पण ती थांबत नाही ...तिला कोणीच थांबवू शकत नाही....
असे म्हणतात, वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही...
पण वेळेचं गणित साधणाऱ्या 'ती' ला मात्र थांबावे लागतं..वेगवेगळ्या रूपात जश्या साध्या-साध्या गोष्टी, 

पोळपाटावर एक पोळी लाटून तयार असते, इतकी जलद ...
पण 'ती' तिथे थांबून रहाते, तव्यावरची आधीची पोळी नीट भाजून होईपर्यंत. कंटाळा आला म्हणून अर्धी-कच्ची सोडत नाही...
कधी घामाघूम होऊन, कधी पाय, कधी पाठ दुखत असते... तरीही
सगळी कामे आटोपल्यावरही,ती ओट्यापाशी थांबते, गॅसवरचं दूध ओतून वाया जाऊ नये म्हणून तशीच,

जोडीदार आकाशी उंच झेप घेत असताना, घरट्यातल्या पिलांच्या पंखात बळ येईपर्यंत , 'ती' थांबते.

शी-शु सांगता येणाऱ्या, पण आपले आपण आवरता न येणाऱ्या मुलांबाळांसाठी, कधी सोबतीला.... बाथरूमच्या दारापाशी ती थांबून असते.
मुलांकडून अभ्यास करून घेताना, शब्द- वाक्य- गणितं- व्याकरण सगळं बरोबर येईपर्यंत 'ती' थांबते.

मुले लहान असो नाहींतर मोठी...परीक्षा, पालक-सभा, त्यांचे अभ्यासासाठी पहाटे लवकर उठणे, रात्री उशिरा झोपणे....सगळ्यासाठी ती त्यांच्या पाठीशी थांबते.

चहा-कॉफीचा एक निवांत घोट नवऱ्यासोबत घ्यायचा म्हणून थांबते..
तेवढ्याच चार निवांत गप्पा होतील, एकमेकांचे त्रास-ताण , शेअर करण्यासाठी.

घरातल्या सगळ्यांना जेवण वाढून होईपर्यंत... कुणी उशिरा येणार असेल तर तोपर्यंत... 'ती' थांबते, जेवायची.

सगळ्यांच्या पाठीशी 'ती', थांबते.
खरंतर ती पाठीशी थांबते म्हणून सगळे चाललंय....व्यवस्थित.

काय हरकत आहे हे मान्य करायला...
तिच्या या, थांबण्यातही एक ऊर्जा आहे ...त्या ऊर्जेमुळेच वेळ चांगली चालली आहे.

गेले सहा महिने महाकठीण  प्रसंगाला सगळं जग तोंड देते आहे, 
पण इथे वेळ भराभर निघून जातो आहे. 

अश्या वेळेस प्रत्येक घरात, ती मात्र पाठीशी 'थांबून' आहे ....अगदी स्ट्रॉंग...

एकही दिवस चूल बंद नाही आहे, 
कंटाळा येतो, थकवा ही...तरीही
रोजच्या-रोज सगळी स्वछता, 
जास्तीची काळजी, सगळी कामे, 
कोणत्याही आजाराला घरात शिरकाव करू द्यायचा नाही असे तिने मनाशी पक्क ठरवले आहे.

म्हणूनच म्हंटल, तिच्या या, थांबण्यातही एक ऊर्जा आहे...त्या उर्जे मुळेच ही अशी कठीण वेळ ही निघून जाईल.
आपल्यातल्याच तिला 'एक सॅल्युट तो बनता है'!
                    

Post a Comment

0 Comments