बळीची मोळी आणि कावळ्यांची आरोळी



✒️प्रशांत वीर-पाटील

यंदाच वर्षे पुर्वीच्या वर्षांपेक्षा बेताच जाईल वाटता - वाटता परतीच्या प्रवासान सारा खेळ खंडोबा करून वरूण राजान दैना करून सोडली. पावसान झोडपल आणि राजानं मारल तर दाद मागायची कोणाला? हीच म्हण काळ - वेळेला समर्पक करायची झाली तर अस म्हणता येईल की "पाऊसाची दडी आणि नेत्यांची पुडी" दोन्हीसाठी ना सांगावा लागतो ना सुगावा. 
यंदा तर ओला दुष्काळ जाहीर करावा, म्हणून ममद्या आणि म्हद्या जोडीने आले होते. एरवी जरी या जोडगोळीच हाताची घडी तोंडावर बोट असत. पण यंदाच साल विरोधी बाकाच असल्यान चाल आणि तोल दोन्ही निराळी आहे.असो आयात केलेल्या प्रतिनिधींना गोठ्यात प्रवेश नसल्याने वावरात हिंडण्यात मजा येत नाही तर तीन- चार टर्म वावर तुडवून सुस्तावलेल्यांची वसवंड ओसरेल म्हणल तरी ओसरत नाही.

त्यामुळे बांदवरले म्हसोबा बी प्रतीक्षा - भोगाचे धनी व्हा असा सुर लावून आहेत. बिचारी जनता  यांची अवस्था ना घर का ना घाटका अशी झाली आहे. अशात पुढच्या पिढीची सोय पाहणारे गयेराम देखील युवराजांच्या हस्ते जनतेप्रती असणारी करूणा दर्शवण्यासाठी भाराभर निवेदने देवुन तत्परता जगजाहीर करीत आहेत. एवढी अफाट माया आणि करूणा असुन देखील बळीराजाच्या माणगुटावरील मोळी उतरत नाही. दुष्काळ ओला असो की कोरडा पार्टीचे धनी तुम्ही होता पण हुर्डा मात्र आमचा का?  निवडणुकांच्या काळात आमच्या हुर्ड्याला प्रचंड प्रमाणात मागणी असते त्यानंतर मात्र पुढच्या पंचवार्षिक पार्टीची वाट पहावी लागते.निदान पिकांच्या दशक्रियेला तरी उपस्थित राहावे एवढी माफक अपेक्षा करुन थांबतो.                                         

Post a Comment

0 Comments