बार्शी/प्रतिनिधी:
येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांचे विरुद्ध दाखल खोटे गुन्हे मागे घेवून सदर तक्रारींची वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी, अशा मागण्यांची शेकडो निवेदने राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटना-संस्था यांचेकडून राज्यपालांना देण्यात येत आहेत. सदर सर्व निवेदने महाराष्ट्र राज्याचे राज्यपालांसह माननीय मुख्यमंत्री, संबंधित खात्याचे सचिव, पोलीस महासंचालक मुंबई, विशेष पोलीस महानिरीक्षक परीक्षेत्र कोल्हापूर, जिल्हाधिकारी सोलापुर आणि पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण सोलापूर यांना पाठवण्यात येत आहेत.
बार्शीतील माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांनी माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून राज्यात नव्हे तर देशात देखील सुरू असलेले काही घोटाळे त्यांनी बाहेर काढून योग्य त्या व्यवस्थेपर्यंत पोहोचवले आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यामधील वाळू माफिया, भूखंड माफिया आणि बेकायदेशीर व्यवसाय याबाबतही त्यांनी अनेक वेळा आवाज उठविला आहे. माहिती अधिकारातून माहिती संकलित करून संबंधित वरिष्ठांना तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार, बेकायदेशीरपणे चालणार्या व्यवसायांना बर्याच अंशी आळा बसला आहे. त्याचबरोबर जलशिवार योजना यामध्ये अतिशय निकृष्ट कामे करून झालेल्या भ्रष्टाचाराकडे शासनाचे लक्ष वेधण्याचे कामदेखील काटकर यांनी केले आहे. त्यामुळे काटकर यांच्या कार्यामुळे अडचणीत आलेले भ्रष्ट लोकसेवक, लाचखोर अधिकारी व अवैध व्यावसायिक जाणीवपूर्वक काटकर यांच्याविरुद्ध षडयंत्र करून, संगनमताने काटकर यांचेवर सरकारी कामात अडथळा करणे, खंडणी मागणे तसेच ऍट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी भावना सामान्य नागरिकांत आहे.
दिनानाथ काटकर यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याची मालिकाच बार्शी शहर पोलीस ठाण्याकडून आणि भ्रष्ट लोकांकडून सुरू झाली आहे, या मालिकेला थांबवण्यासाठी राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते विविध संघटना संस्था या एकत्रित आल्या आहेत आणि खूप मोठा लढा महाराष्ट्रभर उभा होतोय. राष्ट्रीय रविदास परिषद विद्यार्थी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आकाश दळवी हे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे कार्यालयासमोर ५ नोव्हेबर रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय छावा संघटना तालुका अध्यक्ष गणेश मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर, शेगाव, परभणी, फिल्म निर्माता विजय खवरे, सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील, अमोल कोल्हे जिल्हाध्यक्ष छावा मराठा युवा महासंघ जळगाव, नितीन बाबर मनसे नेते इंदापूर जिल्हा पुणे, सामाजिक कार्यकर्ते इसाक झारेकरी, भागवत अष्टनकर नागपूर, रवींद्र कडु, सुधीर पाटील, पंकज पिंगळे, किशोर कांबळे बार्शी, सांगली जिल्हा आडगाव कोष्टी समाज, आरटीआय कार्यकर्ते विलास चावरे अचलपूर जिल्हा अमरावती, आरटीआय कार्यकर्ते विलास शिंदे, देविदास कुंजेटवाड, श्रीकांत रेडकर आणि हटकर कोष्टी समाज बांधव बार्शी यांचेसह शेकडो सामाजसेवी संस्था व समाजसेवकांनी यांनी आरटीआय कार्यकर्ते दिनानाथ काटकर यांच्या समर्थनार्थ राज्यभरातून निवेदने शासकीय व्यवस्थेला पोहचवली आहेत. या निवेदनाच्या माध्यमातून काटकर यांच्याविरुद्ध जे कटकारस्थान होत आहे या कटकारस्थानाचा मागे असणारे समाजकंटक यांचा शोध घेऊन चौकशी करून, सर्व दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, काटकर यांच्या पोलीस संरक्षणात वाढ करावी अशी मागणी होत आहे.
0 Comments