"आयुष्याची मळणी"...संदर्भ-सुगीचे दिवस....✒️मिस्टर रजनी(पत्रकार,कवी,लेखक)
     Email-id : misterajni@gmail.com

पावसाळा जवळजवळ संपून गेलेला असतो.जोमानं वाढलेलं पिक वार्‍यावर डोलत असतं.भाताची लोंबी,नाचणीची कणसं,भुईमुगाच्या शेंगा,रताळी यांना एक वेगळाच रंग आणि सुगंध आलेला असतो.उन्हात चमकणारा शिवार एखाद्या नव्या नवरीसारखा सजलेला असतो...ही असते सुगीची चाहूल...
खरंतर सुगीचे दिवस म्हणजे शेतात राबणाऱ्या प्रत्येकासाठी आनंदाचे दिवस.कारण वर्षभर शेतात घाम गाळून पिकवलेलं सोनं घरात आणण्याचे दिवस.या दिवसांचं खास आकर्षण म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारी भाताची आणि नाचणीची "मळणी"...
खरं तर मळणी म्हणजे एकप्रकारची जत्राच असते आमच्यासाठी.साधारणपणे दसर्‍यात भातकापणीला जोर येतो.भाताची कापणी केल्यानंतर दोन तीन दिवस ते तसंच शिवारात आडवं पसरुन ठेवून वाळवतात.जेणेकरुन ओलसरपण नाहीसा व्हावा व वाहून नेण्यास सोपं जावं.त्यानंतर ते बैलगाडी किंवा ट्रॅक्टरमध्ये भरुन खळ्यावर आणून गोलाकार पद्धतीने पसरलं जातं..
काही वेळा खळं उपलब्ध न झाल्याने किंवा मळणीला उशीर होणार असेल तर कापलेल्या भाताची शेतातच वळी(ढीग)रचून ठेवली जात असे व बाजूनं कुंपण तयार केलं जात असे,जेणेकरून जंगली जनावरांपासून नुकसान होवू नये.
पूर्वी यासाठी खळी तयार केली जायची.म्हणजे ज्याठिकाणी खळं करायचं आहे त्याठिकाणी असलेलं गवत,दगडगोटे गोळा करुन ती जागा साफ केली जायची.त्यानंतर ती जागा पाण्यानं भिजवली जायची जेणेकरुन धुळ व माती घट्ट बसावी व त्यावर शेणानं सारवलं जायचं.त्याला चंदगडी भाषेत "काला" घालणे असंही म्हणतात.
अशाप्रकारे खळं तयार केल्यानंतर त्यावर कापलेलं भात पसरलं जायचं आणि बैलगाडीनं भाताची मळणी केली जायची.खळ्यावर पसरलेल्या भातावर बैलगाडी गोल गोल फिरायची.आम्ही लहान असताना मळणीच्यावेळी बैलगाडीला मागून लोंबकळत रहायचो.कधी गाडीवर चढून खालच्या पिंजरात(गवतात) उड्या मारायचो.पण,त्यामुळे सगळ्या अंगाला खाज सुटायची ती वेगळीच.मग गरम पाण्यानं अंघोळ केल्यानंतर जरा बरं वाटायचं...
मळणीसाठी आजुबाजुच्या शेजारच्यांना,जवळच्या लोकांना,मित्रमंडळी व आप्तेष्टांना बोलावलं जायचं.आणि मग सगळ्यांनी मिळून मळणी काढली जायची.तसेच मळणी खासकरून संध्याकाळी चांदण्यांच्या प्रकाशात काढली जायची.त्याचं कारणंही तसंच होतं.दिवसभर आपापल्या कामात असणारी माणसं संध्याकाळी सहज उपलब्ध व्हायची.याला टाईम मॅनेजमेंट म्हणतात हे आम्ही त्यावेळी शिकलो.
मळणीसाठी खास मटणाचा बेत ठरलेला असायचा.खरं तर या मांसाहारी जेवणाचा एक वेगळाच कार्यक्रम असायचा.त्यातही पिंडक(चंदगडी शब्द)अर्थात पिणाऱ्यांचा वेगळा ग्रुप असायचा.मळणी आटोपल्यानंतर लगेचच जेवणाच्या पंगती बसायच्या.सारं कसं आनंदाचं वातावरण.सगळी कामं कशी मजेत पार पडायची.
अशाप्रकारे आज माझी,उद्या दुसर्‍याची ,तर परवा तिसर्‍याची असं करुन प्रत्येकाची सुगी साजरी होत असे.एकमेकाच्या मळणीला व मदतीला गेल्यामुळे लोकांमध्ये मैत्रीपूर्ण व स्नेहपूर्ण संबंध तयार व्हायचे...मळणीच्या निमित्ताने एकमेकांशी संवाद व्हायचा,एकमेकांशी बोलणं व्हायचं.त्यातूनएकमेकांच्या भावना,सुखदुःखं,अनुभव समजायचे व वाटून घेतले जायचे.त्यामुळे माणसा माणसात आपुलकी निर्माण व्हायची...नात्यांमध्ये गोडवा निर्माण व्हायचा...
पण,जसजसा काळ बदलत गेला तसतशा काळाबरोबर सगळ्या गोष्टी बदलत गेल्या.
आता मळणीसाठी खळी तयार केली जात नाहीत.त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या तयार प्लास्टिकच्या ताडपत्र्या वापरल्या जातात.बैलगाडीची जागा आता ट्रॅक्टरनं घेतलीय.त्यामुळे वेळ वाचलाय फक्त,पण मळणीची मजाच उरली नाही.ट्रॅक्टरच्या कर्णकर्कश आवाजाबरोबर बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज कायमचा नाहीसा झालाय.पूर्वीसारखी एकमेकांच्या मळणीला लोकं जात नाहीत आता.संवाद तर दूरचीच गोष्ट...
त्यामुळे मळणी झाल्यानंतर ताडपत्र्या उचलल्या जातात,पण मळणीच्या जागेवर मळणीचा लवलेशही नसतो,मळणीच्या आठवणी नसतात.जणू एखादा गुन्हा करून पुरावे नष्ट केल्यासारखंच वाटतं ते मला...
पूर्वी मळणी झाली तरी खळ्याचा वापर धान्य वाळवण्यासाठी केला जायचा.त्यामुळे खळ्यावर पसरलेलं धान्य बघून मन भरुन यायचं.वर्षभर शेतात गाळलेल्या घामाचं चीज झाल्यासारखं वाटायचं.घरातली म्हातारी माणसं खळ्यावरच्या वाळत घातलेल्या वाळवणाची दिवसभर राखण करायची.त्यातही आजुबाजुच्या झाडावरचे पक्षी त्यांची नजर चुकवून त्या वाळत घातलेल्या धान्यातील एक-एक दाणा अलगद आपल्या चोचीत धरुन पुन्हा झाडावर जाऊन बसायचे.त्याचंही एक वेगळंच समाधान मिळायचं मनाला...

पण आता असं काहीच होत नाही.आणि पक्षी तरी कुठं शिल्लक राहिलेत म्हणा.तंत्रज्ञानानं निसर्गाची जी हानी केलीय ती वेगळीच.
खरं तर यंत्रानं माणसाचं जगणं सुखकर केलंय पण जगण्यातला आनंद मात्र हिरावून नेलाय...
खरं तर आपल्या आयुष्यात पण असे सुगीचे दिवस येत असतात.आयुष्यात येणारे बरे वाईट प्रसंग,सुख दुःखाच्या क्षणांची मळणी करुन,त्यातून आनंदाचे क्षण वेचून घेणं व आपल्याबरोबरच इतरांमध्येही तो आनंद वाटणं आणि त्यांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलवणं ही एक प्रकारची सुगीच आहे...
बाकी,ऋतुप्रमाणं बदलत जाणं,काळाबरोबर चालत राहणं आणि येणार्‍या संकटांना तोंड देत ताठ मानेनं पुन्हा उभं राहणं...शेतातल्या पिकासारखं...
हेच तर खरं जीवन आहे...
हीच खरी सुगी आहे...

(क्रमशः)

Post a Comment

0 Comments