सासरच्या जाचाला कंटाळून गरोदर विवाहितेची आत्महत्या



पंढरपूर/ प्रतिनिधी :

पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे सासरच्या जाचाला कंटाळून एका १९ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी करकंब पोलिसांनी सासू, सासरे, दिर आणि पती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विद्या रणजीत गोड असे आत्महत्या केलेल्या विवाहितचे नाव आहे. विद्या ही चार महिन्याची गरोदर होती.
 
करकंब येथील जळोली परिसरात राहणारी विद्या हिचा २ वर्षांपूर्वी  रणजीत गोड याच्यासोबत विवाह झाला होता. गेल्या काही दिवसांपासून सासरची मंडळी विद्यावर घरकाम करण्यावरून आणि तिच्या कुटुंबाकडून आर्थिक मागण्या होत होत्या. अखेर सासरच्या जाचाला कंटाळून विद्याने तिच्या राहत्या घरात बुधवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. शारीरिक आणि मानसिक दबाव आणत असल्याचा आरोप विद्याच्या कुटुंबियांनी केला आहे. 

या प्रकरणात पोलिसांनी विद्याचा पती रणजीत गोड़, सासू शांताबाई गोड,  दिर विश्वजीत गोड, सासरा अंकुश गोड यांच्याविरोधात कारक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी विद्याचे वडील औदुंबर मारुती बेडगे यांनी फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत पाटील करत आहेत.

Post a Comment

0 Comments