प्रा.डॉ.प्रभाकर तानाजी माने
प्रमुख, अर्थशास्त्र विभाग
जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर
-------------------------------------
मित्रांनो जागतिक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतात ही मार्च महिन्यापासून सुरु झालेली कोरोना महामारी ही कमी-अधिक प्रमाणात वाढत जावून ऑगस्ट महिन्यापर्यंत तीव्र झाली.कदाचित पुढील दोन महिन्यांमध्ये कोरोना महामारी ही शीर्ष किंवा अत्यंत वरच्या स्थानी जाऊन संपूर्ण देश ढवळून निघणार आहे हे आपण सर्व जाणतो. आज आपण कोरोना या राक्षसरुपी महामारीच्या मृत्यूच्या जबड्यात आहोत. कदाचित याची समज व माहिती या देशातील बालकांना व मुलांना देखील असेल याची अधिक तीव्रता भारतासह संपूर्ण जगाला ही आहे.
आजपर्यंत आपण राष्ट्रभक्ती व देश प्रेमापोटी व भारतीय संविधानाचा मान राखून या देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी या देशातील संपूर्ण जनतेने एक दिलाने या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना साथ दिली व पुढे ही देणार याबाबत तीळमात्र शंका नाही.याची समज मात्र या देशातील राज्यकर्त्यांना का नसावी किंवा त्याचे राजकारण मुद्दाम व जाणीवपूर्वक करीत आहेत असे वाटते. माननीय मोदीजींच्या आदेशाप्रमाणे आपण सर्वांनी ते सांगतील त्याप्रमाणे थाळीनाद, घंटानाद,तर कधी मेणबत्ती पेटवून या देशात थैमान घालू पाहणाऱ्या कोरोनारुपी राक्षसाला या देशातून हाकलून देण्यासाठी आपण सर्वांनी हे राष्ट्रकार्य एकत्रितपणे व मनोभावे पूर्ण केले.पण नंतरच्या टप्प्यात मात्र कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी या देशातील शासनाने दिलेल्या आदेशानुसार तसेच जागतिक व राष्ट्रीय आरोग्य संघटनेने वेळोवेळी जारी केलेल्या परिपत्रकानुसार तसेच या देशात सरकारला सर्वच पातळीवर लोकांनी दिलेला पाठिंबा, सहकार्याने व कोरोना योद्ध्यांचा मदतीने आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत राहिलो काही बाबतीत आपल्याला यशही मिळालं. मात्र ही कोरोना विरुद्धची लढाई आपल्याला अर्ध्यात सोडून चालणार नाही त्यासाठी पुनश्च एकदा वीर योध्याप्रमाणे दिवस-रात्र काम करून या कोरोनाला मुळासकट हाकलून दयाचे आहे अशा प्रकारची मानसिकता व विचारधारा या देशातील लोकांची करण्याऐवजी या देशातील तथाकथित काही पक्षाच्या राज्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक या देशातील प्रत्येक धर्मातील लोकांच्या भावनेचा खेळ खेळून,दिशाभूल करून जाणीपूर्वकपणे मंदिरे, मशिदी, चर्च,गुरुद्वारा व इतर काही धार्मिक स्थळे खुली करावीत.या देशातील लोकांना मानसिक गुलाम करून कोरोना महामारी च्या विरुद्ध लढण्यासाठी बळ देण्याऐवजी त्यांना भावनिक आवाहन करून धार्मिक स्थळी जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या व कोरोना महामारीचे जाणीपूर्वक राजकारण करणाऱ्या तथाकथित राजकर्त्यांनी लोकांचा मृत्यूचा बाजार मांडू नये. एक वेळ शत्रूशी मैत्री करू पण मानवतेचे नकली मास्क चेहऱ्यावर घालून देवदूत असल्याचा भास दाखवून लोकांच्या जीविताची हेळसांड करणाऱ्या लोकांनी सत्य व वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे. या देशांमध्ये जाती,धर्म, पंथ व लिंग याच्या आधारावर व त्यांच्या भावनेशी खेळून खूपच लढाया जिंकल्या गेल्या. मात्र आता ही लढाई कोरोना या महामारी विरोधची आहे याची समज या देशातील सर्व जनतेला आहे हे विसरून चालणार नाही.
गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये सर्व पक्ष व नेत्यांकडून धार्मिक स्थळे खुली करण्यासंदर्भाचा अट्टाहास कशासाठी चालला आहे हे माहीत नसणं इतके लोक खुळे नाहीत हे ओळखलं पाहिजे.मात्र औरंगाबाद या सारख्या शहरांमधून माजी व आजी खासदार यांनी भीष्मप्रतिज्ञा मनात धरून धार्मिक स्थळे खुली करण्यासंदर्भातचा जो नकली मुखवटा घालून त्या माध्यमातून मंदिरे व मशिदी खुली करून नेमकं काय साध्य करायचं आहे याबाबत महाराष्ट्रातील जनतेला व औरंगाबाद शहरातील लोकांना यामागील सत्य ठाऊक आहे.जर लोकांना ही अशा बेजबाबदार नेत्यांचा खो ला पाठिंबा दर्शविल्यास हे लोक देखील तेवढंच जबाबदार असणार आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
आज या देशात किंबहुना महाराष्ट्रात मंदिर, मशिदी,चर्च , गुरुद्वारा व इतर धार्मिक स्थळे खुली करण्यापेक्षा आज मोठ्या प्रमाणात नवीन कोव्हीड हॉस्पिटल व रुग्णसेवेची नितांत आवश्यकता आहे.मात्र या देशातील हा बाळरुपी कोरोना म्हणता म्हणता तो प्रौढरुपी राक्षस झाला आहे.आज मात्र या देशातील जनता ही मार्च महिन्यापासून ते आजपर्यंत प्रधानमंत्री सांगतील त्याप्रमाणे या देशातील प्रत्येक नागरिक वागला आहे व वागत आहे. कारण या देशातील प्रत्येक नागरिकाला या देशाच्या पंतप्रधान विषयी आपुलकी प्रेम, आस्था व आदर आहे. त्याचप्रमाणे याच देशातील प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्याला एक प्रकारचा सार्थ व ठोस अभिमान या देशातील जनतेविषयी असलाच पाहिजे अशी अपेक्षा असते. मात्र मित्रांनो भारतात किंबहुना या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष कोरोना महामारीला दूर ठेवण्यासाठी व त्याच्या निर्मूलनासाठी अविरतपणे प्रयत्नशील आहेत.मात्र काही नेत्यांच्या अट्टहासामुळे क्षणिक व हलक्या प्रसिद्धीसाठी नकली देवदूत बनून लोकांची श्रद्धा व भावनेशी खेळणे योग्य आहे का असा विचार जनमानसात निर्माण होत आहे. काही विशिष्ट राजकीय पक्षाकडून महत्वकांक्षेपोटी सत्ताधारी पक्षाची जनमानसात असणारी प्रतिमेबद्दल संभ्रमावस्था निर्माण करीत आहेत. यांना आपण खूप कट्टरवादी आहोत अशी कृत्रिम भूमिका निर्माण करणारे हे राजकारणी आमच्याच नशिबी का? असा प्रश्नही लोकांच्याकडून विचारला जात आहे. त्याचबरोबर हिंदू व मुस्लिम जनतेचे आम्हीच कसे कट्टर प्रतिनीधी आहोत असा भास व फार्स निर्माण करून कदाचित या कोरोनाच्या काळात हिंदू-मुस्लीम दंगल न होणे अपेक्षित आहे.या वैचारिक दिवाळखोरी असणाऱ्या नेत्याकडून अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्या कार्यकर्ते व समर्थकांकडून केली जात असते व त्याचेच टिमकी हे लोक दिवस-रात्र वाजवित असतात.
खरं म्हणजे एप्रिल ते जून या तिमाहीचा देशाचा आर्थिक विकास दर उणे २३ झालेला आहे. याची चिंता या देशातील तमाम नेत्यांना होणे गरजेचे आहे तसेच या देशात प्रचंड मंदीचे सावट व बेकारीची कुऱ्हाड या देशातील जनतेच्या मानगुटीवर आहे.शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न, या देशातील उद्योगधंदा बंद पडण्याच्या मार्गावर,वित्तीय संस्था तोट्यात व दिवाळखोरीत निघण्याची शक्यता असताना, नवीन शैक्षणिक धोरण व शिक्षणाचा प्रश्न, कामगारांचा मोठा गंभीर प्रश्न, समाजातील दारिद्र्यरेषेखाली व दारिद्रय रेषे लगत जगणारे लोक, वंचित घटक, आदिवासी, दलित,कामगार व शोषितांचा जगण्याचा प्रश्न गंभीर व तीव्र असताना यांना असं कसे विपरीत सुचते हे मात्र खूप भीतीदायक व विनाशकारी आहे.
शेवटी , या देशातील माझ्यासह तमाम जनतेला ही धार्मिक स्थळे लवकरात लवकर खुली व्हावीत अशी अपेक्षा आहे पण दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्णांची संख्या व त्यांचा वाढता मृत्यूदर तसेच सार्वजनिक आरोग्य यंत्रणची अल्प सक्षमता , कमतरता पाहता व देशातील रुग्णांची गंभीरता पाहून ही धार्मिक स्थळे सध्यातरी खुली न करण्याबाबत लोकांचे एकमत आहे.या देशातील तमाम जनतेला हे कळून चुकले आहे की, राजकारणी मंडळी देवाला ही राजकारणाच्या आखाड्यात वेठीस धरीत आहेत. मग या देशातील सर्वसामान्य जनतेचे काय? कोरोनाच्या महामारीमध्ये धार्मिक स्थळीं सुरू करून लोकांना काही झाल्यास त्यांच्या जीविकेचा व जीवितेचा खर्च व सर्व जबाबदारी हे सर्व नेतेगण स्वीकारणार आहेत का? असा प्रश्न आवाचून पुढे येतो आहे. म्हणूनच या देशातील संतानी म्हटल्याप्रमाणे "मनी नाही भाव, देवा मला पाव" अशा प्रकारची भावना या देशातील सत्ताधारी व विरोधी नेत्यांची झाली असावी असे मनोमनी आम्हांस वाटते.
_______________________
1 Comments
Very good
ReplyDelete