शरद पवार दिवसभर अन्नत्याग करणार ! मोदी सरकार विरोधात आक्रमक पवित्रा


नवी दिल्ली : “कृषी विधेयक प्रकरणी राज्यसभा खासदारांच्या पाठिंब्यासाठी आज दिवसभर मी देखील अन्नत्याग करणार आहे”, अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केली आहे. “८ खासदारांच्या निलंबनाचा निर्णय अयोग्य आहे. केवळ भूमिका मांडण्यासाठी खासदारांचे निलंबन करण्यात आले. अशा पद्धतीने खासदारांचा मूलभूत अधिकार हिरावणे अयोग्य आहे. त्यामुळे, सदस्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन मी देखील अन्नत्याग करणार”, असे शरद पवारांनी जाहीर केले आहे.

केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांना राज्यसभेत जोरदार विरोध झाला होता. विधेयकाला विरोध करत सदस्यांनी चर्चेची मागणी केली होती. त्यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकरणी आठ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळं काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. खासदारांचे निलंबन मागे न घेतल्यास उर्वरित कामकाजावर बहिष्कार घालण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याच निर्णयाबद्दल शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments