माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेच्या यशस्वितेसाठी लोकसहभाग महत्वाचा : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर



सोलापूर, दि.१९:  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत नागरिकांनी, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेबाबत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरुन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची आज मुलाखत प्रसारीत झाली. त्या मुलाखतीत श्री.शंभरकर यांनी हे आवाहन केले. आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी सुनील शिनखेडे यांनी ही मुलाखत घेतली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. 

जिल्ह्यातील गृहभेटी द्वारे संशयित रुग्णांची तपासणी, उपचार, जोखमीच्या ओळखुन उपचार, आरोग्य शिक्षण हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. असे सांगून श्री. शंभरकर म्हणाले, “ही मोहीम १५ स्पटेंबर पासून १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत दोन टप्प्यात होईल. या मोहिमेद्वारे सोलापूर महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रात राबविली जाईल. मोहिमेत आरोग्य पथकाद्वारे घरोघरी जावून तपासणी केली जाईल. एका आरोग्य पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील हे पथक घरातील सर्व सदस्यांचे तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासेल संबंधित माहिती लगेचच राज्य शासनाने विकसित केलेल्या मोबाईल ॲप मध्ये भरली जाईल.” 

मोहिमेत सहभागी आरोग्य पथकांना त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. नोंदी कश्या घ्याव्या, त्याची मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये माहिती कशी भरावी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

 या मोहिमेच्याद्वारे सतत मास्क घालावा, साबणाने हात स्वच्छ धुवावे, नाक,तोंड,डोळे यांना हात लावू नये, ताप,सर्दी,खोकला, घसा दुखणे, धाप लागणे, अशी लक्षणे दिसल्यास तपासणी करुन घ्यावी. तसेच लगेच उपचार करुन घ्यावेत हे संदेश प्रभावीरित्या जनतेपर्यंत पोहचविले जाणार आहेत. बरे झालेल्या कोरोना बाधितांनी  काय काळजी घ्यावी, याबाबतही या मोहिमेतून संदेश दिला जाणार आहे, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

 माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत जनतेचा सहभाग महत्वाचा आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, धार्मिकगुरु आदींची मदत घेतली जात आहे. या मोहिमेसाठी  व्यक्ती आणि संस्था यांच्यासाठी बक्षिस योजना आहे. निबंध, पोस्टर, मेसेज, शॉर्ट फिल्म आदींच्या स्पर्धा असतील. संस्थांसाठीही  बक्षिस योजना आखण्यात आली आहे, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments