बार्शी/प्रतिनिधी:
केंद्र सरकारने सोमवारी अचानक निर्णय घेत कांद्याच्या निर्यातबंदी संदर्भातील अधिसुचना जाहीर केली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनीही तीव्र निषेध केला आहे. याच पार्श्वभूमीवर विरेश आंधळकर या शेतकरी तरूणाने राज्याच्या राज्यपालांना भेटीसाठी वेळ मागितली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांसह कंगना राणावतला भेट देणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पुत्राने भेटीसाठी वेळ मागितली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अतिशय संवेदनशील मनाचे असून न्यायासाठी त्यांच्याकडे दाद मागणाऱ्याला ते नक्की भेटतात. काही दिवसांपूर्वी ते एका सैनिकाला भेटले. इतकंच नव्हे तर प्रसिध्द सिनेतारका कंगना रनौत हिचे मुंबईतील कार्यालय पालिकेने तोडल्याच्या तक्रारीवर तिलाही भेटीसाठी वेळ दिला.इथे कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने तर राज्यात लाखो शेतकऱ्यांची घरे उध्वस्थ झाली आहेत, या शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे राज्यपाल मध्यस्थी करतील आणि शुक्रवारी आम्हाला ते नक्कीच भेट देतील, असं शेतकरी संघर्ष संघटनेनं म्हटलं आहे.
शेतकरी तरूणाने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, विरेश आंधळकर सौंदरे (बार्शी, सोलापूर) गावचा रहिवासी आहे. मी एक पदवीधर असून माझी वडिलोपार्जित शेती आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटामध्ये मला गावी परतावे लागले. ही केवळ माझी एकटयाची परिस्थिती नसून राज्यातील शहरामध्ये बहुतांश शेतकऱ्यांची काम करणारी आणि शिकणारी मुले आता गावाकडे परतलेली आहेत. वैश्विक महामारीमुळे आता गावी परतावे लागले. त्यामुळे वडिलोपार्जित शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांनी काम करून उत्पन्न काढण्यासाठी जीवाचे रान केल आहे.
यंदा निसर्गाने देखील साथ दिलीय मात्र त्यातच अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकरी यंदा मेटाकुटीला आलेला आहे. जास्त पावसामुळे रोपांवर रोग पडले. 3 ते 4 हजार रुपये किलोने घेतलेले कांदा बियाणे यामुळे खराब झाले. त्यातून काही वाचलेल्या रोपांची लागण केली तर आता केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लादली त्यामुळे कांदा भाव गडगडणार यात शंका नाही. उत्पादन खर्च एकरी ३५ ते ४० हजारांच्यावर जात असताना भाव मात्र किरकोळ मिळणार असल्याने खर्चही निघणार नाही. अशामध्ये शेतकरी आणि शेतीबद्दलचे निर्णय घेताना सरकार दरबारी आमची दखल घेतलीच जात नाही. तरी आपण संपूर्ण राज्याचा आधार आहात. आजवर अनेक राजकारणी, सिनेकलाकारांनी आपली भेट घेतल्यानंतर त्यांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. नैसर्गिक आणि सरकारी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आपणच आता आधार होऊ शकता. तरी वरील सर्व परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी आपली भेट मिळणे अत्यंत गरजेचे आहे. तरी कृपया इतरांप्रमाणे आपण आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना देखील भेटण्यास वेळ द्यावा ही हात जोडून विनंती, असे भलेमोठे पत्र शेतकरी पुत्र विरेश आंधळकर याने राज्यपालांना लिहिले आहे.
त्यामुळे कांदा उत्पादकांवर अन्याय होत असताना राज्यपाल शेतकरी पुत्राला भेटीसाठी वेळ देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
0 Comments