✒️मिस्टर रजनी(पत्रकार,कवी,लेखक,)
संदर्भ-धनगरवाड्यावरचं जगणं आणि मरणं.
डोंगर म्हटलं की सगळं कसं हिरवंगार.उंचच उंच वाढलेली झाडं,वेली,पानं,फुलं,डोंगराला वळसा घालून वाहणारी नदी,डोंगरकपारीतून वाहणारं पाणी,झरे,धबधबे आणि जंगलात मनसोक्तपणे वावरणारे प्राणी,पक्षी इत्यादी बरंच काही...
पण या हिरव्यागार सौंदर्यामागे लपलेलं असतं एक वास्तव जे इतरांच्या नजरेस कधी पडतच नाही...
कोरोना आला आणि सगळं जग जागच्या जागी थांबलं.शहरात म्हणा किंवा गावागावात शासकीय मदत पोचत होतीच पण या लॉकडाऊनच्या कालावधीत डोंगरकपारीत दुर्गम भागात वाड्यावस्त्यांवर राहणार्या लोकांचं काय...?
त्यांच्यापर्यंत काही मदत पोचलीय की नाही हे माहिती नव्हतं.
खरं तर लॉकडाऊनच्या कालावधीतच सगळ्या धनगरवाड्यावर जावून लोकांना भेटून यावं असं आमचं नियोजन होतं पण कोरोनाच्या कालावधीत प्रत्येक गावानं आपापल्या सीमा बंद केल्यामुळे प्रवास करणंही अवघड होतं...
शेवटी तिकडे जाण्याचा योग आला.ठरल्याप्रमाणे मी आणि विठ्ठल तिलारीच्या दिशेने निघालो...
तसा तिलारीचा भाग हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.या भागात बरेच धबधबे आहेत.तिथून जवळच कोदाळी घाट जो गोव्याला जाण्यासाठी अत्यंत धोकादायक पण जवळचा मार्ग आहे.पश्चिमेला पारगड आणि पूर्वेकडे कलानिधीगड(जुनी लोकं त्याला काळानंदीगड असंही म्हणतात)आणि डोंगरातून आतल्या बाजूला तिलारी धरण प्रकल्पाच्या दिशेने गेलात तर तुम्ही पोचता थेट स्वर्गात...म्हणजेच स्वप्नंवेल पॉईंटला.हा खुपच प्रसिद्ध धबधबा आहे या भागातला.असा हा सगळा सोंदर्यानं नटलेला परिसर आहे...
या सौंदर्याबरोबरच इथल्या डोंगरकपारीमध्ये वसले आहेत कित्येक धनगरवाडे.तिलारीतून दोन तीन कि.मी पुढे गेल्यानंतर बिदरमाळ धनगरवाडा लागतो जो मुख्य रस्त्यापासून दिड ते दोन कि.मी आतल्या बाजूला आहे.पावसाचे दिवस असल्यामुळे दुचाकी घेऊन आत जाता येणं शक्यच नव्हतं.रस्त्याच्या बाजुला एक गुराखी गुरं चारत होता.रस्त्याकडेला गाडी लावून आम्ही त्याच्याकडे गेलो.त्याला आमचं येण्याचं कारण सांगितलं.भागातलेच आहेत हे कळल्यावर तो आपुलकीनं बोलू लागला...
बराचवेळ चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून बरीच माहिती मिळाली.आम्ही ज्या माळावर थांबलो होतो त्याचं नाव बिदरमाळ.आम्ही धनगरवाड्यावर निघणारच होतो पण त्यांनी सांगितलं की आता कोण भेटणार नाहीत.सगळी माणसं कामाला गेल्यात.मग पुन्हा कधीतरी येण्याचं आश्वासन देवून आम्ही त्यांचा निरोप घेतला.
गाडी सुरु करुन आम्ही निघालो.रविवार असल्याने रस्त्याला बरीच गर्दी होती.थोडंसं पुढं गेल्यावर आणखी एक माणूस समोरुन येताना दिसला.उंच आणि तगडी शरीरयष्टी,गोल गुबगुबीत चेहरा,झुपकेदार आणि पिळदार मिशा,कमरेच्या चामडी पट्ट्यात अडकवलेला कोयता,हातात काठी(आमच्या भाषेत टोना),खांद्यावर घोंगडं आणि प्रत्येक पावलागणिक आवाज करणारं पायताण.तो आपल्या ऐटीत येत होता.
त्याला बघून मी गाडी थांबवली.मग विठ्ठलनं बोलायला सुरुवात केली.त्यालाही इकडे येण्याचं कारण सांगितलं.पण,बोलताना तो आमच्याकडे थोडा संशयानं पाहत होता हे माझ्या लक्षात आलं.मग मी त्याला आमच्या चंदगडी भाषेत बोलायला सुरुवात केली आणि हाजगोळी आणि धामणे गावातल्या आमच्या ओळखी सांगितल्या.तेव्हा कुठं तो मोकळेपणानं बोलू लागला.तो बांदराईत राहत असल्याचे त्याने सांगितले.माळावर जनावरं चरायला सोडल्यात,जरा भाकरीचा तुकडा खातो म्हणून जावून आलो असं तो म्हणाला.त्याला वाड्याकडे जाणार असल्याचे सांगितले.मग त्यानं रस्ता सांगितला आणि आम्ही पुढं निघालो.
जास्त वेळ न दवडता आम्ही बांदराईच्या दिशेने निघालो...
आम्ही जंगलाच्या अगदी मध्ये होतो.एकबाजुला खोल दरी आणि चारीबाजुंनी घनदाट जंगल.रस्त्याच्या कडेने चरत जाणारी जनावरं तुमचा रस्ता अडवत असतात.एका ठिकाणी तर ३०-४० जनावरांचा हिंड(घोळका) आमच्या समोर आला.बराचवेळ त्यांनी आमची वाट अडवून ठेवली.पण,ही जनावरं मारत नाहीत.शांतपणे चालू लागतात आपल्या तालात...
तसं बघायला गेलं तर या भागात फिरताना जंगली प्राण्यांचा जास्त धोका असतो.गवे,रानडुक्करं,हत्ती याचबरोबर अधून मधून कधीतरी बिबट्या सुद्धा या भागात चक्कर मारुन जातो.आणि सगळ्यात जास्त धोकादायक म्हणजे अस्वल.हल्ली इथल्या अस्वलांच्या संख्येत बरीच वाढ झालीय अशी माहिती एका धनगरानं आम्हाला दिली.त्यामुळे तिथून पुढचा सगळा प्रवास आम्ही जीव मुठीत घेऊनच केला हे वेगळं सांगायला नकोच...
थोड्याच वेळात आम्ही बांदराईत पोचलो.बांदराई अगदी रस्त्यालगत असलेला धनगरवाडा.मुख्य रस्त्यापासून आत कच्च्या रस्त्याने शंभर मीटर आत गेल्यावर बांदराईत जातो.इथं बरीच घरं आहेत.आम्ही थेट शेवटच्या टोकाला पोचलो.खुप सारी लहान मुलं मुली खेळत होती.या वाड्यावर शाळा पण आहे.पण माणसं कुणीच दिसत नव्हती.एक आजी एका खोपटंवजा घराच्या दरवाज्यातून आमच्याकडे डोकावून पाहत होती.तीनं सांगितलं की वाड्यावरची सगळी माणसं जंगलात गेल्यात.आता कोण भेटणार नाहीत.आम्ही जास्त काही न बोलता तिथून निघालो होतो तेवढ्यात एका घरातून एक माणूस बाहेर पडला.म्हटलं जाता जाता त्याच्याशी बोलून निघू.त्याच्या घरोसमोर गाडी लावली आणि त्याला इकडं येण्याचा उद्देश स्पष्ट केला.त्यांच्यासोबत त्यांची आईसुद्धा होती.तीनं आपुलकीनं चौकशी केली आणि बसायची विनंती केली.मग बराचवेळ आमच्या गप्पा रंगल्या.चर्चेतून बरीच माहिती समोर आली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या वाड्याची लोकसंख्या जवळपास १५० च्या आसपास.गावात चौथीपर्यंत शाळा.पुढील शिक्षणासाठी मुलांना गावापासून दहा कि.मी वर असलेल्या तिलारी किंवा कोदाळी या गावात जावं लागतं.प्रवासाची कुठलीही साधनं नसल्याने सगळा प्रवास चालतच करावा लागतो.कोदाळी ग्रामपंचायतीला हा वाडा जोडलेला आहे.लोकांना मिळणारं स्वस्त धान्य कोदाळीला जावूनच आणावं लागतं.वैद्यकिय सुविधेचा तर पत्ताच नाही.अचानक रात्री अपरात्री काही अडचणी निर्माण झाल्यास किंवा गंभीर रुग्ण असल्यास कोणतीही पर्यायी सुविधा नाही.मोबाईल नेटवर्क तर नाहीच आणि कित्येक वर्षांपूर्वी तिलारी प्रकल्पाचं काम सुरू असताना तयार केलेला रस्ता कधीचा नाहीसा झालाय.त्यामुळे रुग्णवाहिकेसारखी तातडीची सुविधा मिळणंही दुरापास्त.एखाद्या दुसर्या वाड्यावर वीज कशीतरी पोचलीय पण रस्त्यांचा पत्ता नाहीच.
मग पाण्याची काय सोय आहे इथं...?
माझ्या या प्रश्नावर थोडंसं डोळ्यात पाणी आणूनच तो बोलला,पाण्याची काय सोय नाही बघा.विहीर आहे पण उन्हाळ्यापर्यंत पुरत नाही त्यामुळे झर्याचं पाणी आणतो बघा प्यायला.दोन-अडीच कि.मी लांब जावं लागतं बघा पाण्यासाठी...
पुढं काय बोलावं काय कळत नव्हतं मला पण एक गोष्ट मात्र समजली की पाणी हे जर जीवन असेल तर पाण्यासाठी रोज मरावं लागतं इथल्या माणसांना...
मी म्हटलं,पोटापाण्याची काय व्यवस्था...?
तो म्हणाला,थोडीफार शेती करतो,म्हणजे फक्त भातशेती.पण,जंगली जनावरं काय ठेवत नाहीत बघा.तारा बांधून तरी किती बांधणार...?
आणि मजुरीचं म्हणत असाल तर फॉरेस्ट डिपार्टमेंटची काम असतात अधेमध्ये.खड्डे खोदणे,झाड लावणे,झाडांना भरती घालणे इत्यादी.किंवा पावसात कोसळलेली झाडे तोडून ती गोळा करुन,गाडीत भरुन पाठवणे वगैरे.पण,काम रोजच मिळेल याची शाश्वती नाही.
तेवढ्यात ती आजी बोलली.म्हणाली,बाकीच्या गावातनं बायकांस्नं काजु फॅक्टरीत आणि कुटे कुटे कामं मिळत्यात,आम्ही काय करुचं तुम्हीच सांगा...?यका जाग्यास बसोन पोटं कशी भरुची...?
मग मी थेट मुद्द्यावर आलो.म्हटलं,तुमची नेमकी मागणी काय आहे ती थोडक्यात सांगा.
मग तो माणुस बोलू लागला...
आम्हाला स्वस्त धान्यासाठी जे दहा बारा कि.मी वर पायपीट करत जावं लागतं त्यापेक्षा आमचा वाडा आणि आमच्या आसपासच्या वाड्या वस्त्यांसाठी इथंच एखाद्या स्वस्त धान्य पुरवठा दुकानाची सोय करायला हवी.शहरातल्या बायकांना जसे गृहउद्योग उपलब्ध करतात तसे काही आमच्यासाठीही उपलब्ध करता आले तर त्यावरही विचार करावा.जनावरांचा डॉक्टर जसा गावागावातनं फिरतो तसा माणसांचा डॉक्टर इकडं का फिरु नये...?आम्हाला जनावरांएवढीही किंमत नाही का...?
खुप सारे प्रश्न आहेत त्यांच्याकडे ज्यांची किमान पर्यायी उत्तरं शोधणं गरजेचं आहे...
एव्हाना चार वाजून गेले होते.मध्येच पावसानं हजेरी लावली.मग पाऊस जाईपर्यंत आम्ही थांबलो.त्या धो धो कोसळणाऱ्या पावसात दोन मुलं आनंदानं उड्या मारत होती.मी फोटो काढायला म्हणून मोबाईल समोर धरला तर ती पळून जावू लागली.मग कसेबसे दोन फोटो काढले.उगाच त्यांच्या आनंदावर पाणी कशाला सोडा म्हणून त्यांचं बागडणं बघत मी गप्प बसलो.थोड्या वेळानं पाऊस थांबला.त्यांचा निरोप घेऊन आम्ही जायला निघालो.जाता-जाता त्या पावसात नाचणार्या मुलाला मी त्याचं नाव विचारलं.तर तो म्हणाला,विकास....!
मग तिथून आम्ही बाहेर पडलो आणि धामणे गावच्या दिशेने निघालो.मध्ये आणखी काही वाड्या वस्त्या लागतात पण पावसामुळे दुचाकीवरुन जाणं शक्य नव्हतं.रस्त्यावर गाडी लावून एक दोन कि.मी आत जाणंही अवघडच होतं.
मग जाता जाता धामणे गावच्या जवळपास सहा कि.मी अलिकडे रस्त्यालगत असलेल्या धामणे वाड्यावर गेलो.इथंही कुणी माणुस दिसत नव्हतं.अलिकडेच गाडी थांबवून कोण दिसतंय का याचा कानोसा घेतला.पहिल्याच घरात एक आजीबाई दिसल्या.आजी म्हणाली,सगळीजाणं कामास गेल्यात,जरासं थांबा.यतीलच यवढ्यात...
आम्ही म्हटलं नको,पुन्हा येणारच आहे इकडं.तेंव्हा भेटतो सगळ्यांना.आणि तिथनं आम्ही बाहेर पडलो...
हाजगोळीत राहत असल्यामुळे तसा बर्याच वेळा आलोय मी या वाड्यावर.त्यामुळे इथे ओळखीचे बरेचजण आहेत.धामणे गावाला जायला इथून जवळची वाट आहे पण ती जंगलातून जाते.
तसा या वाड्याचा प्रश्न जरा वेगळाच आहे.या वाड्यावर रस्ते,पाणी,वीज,दवाखाना अशी कुठलीच सोय नाही.आणि यापेक्षा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे सीमाप्रश्न लोंबकळत पडल्यामुळे धामणे गाव महाराष्ट्राच्या हद्दीत असून जे कागदोपत्री कर्नाटकात येतं.आणि कर्नाटकाच्या हद्दीपासून जवळपास १५-२० कि.मी आत आहे.त्या गावाला हा धामणे वाडा संलग्न असल्यामुळे यांच्या दैनंदिन कामकाजात कित्येक अडचणी येतात.
सरकारी कागदपत्रे काढताना तर कित्येकांची मुळ कागदपत्रेच उपलब्ध नाहीत.हा जवळपास सगळ्याच वाड्या वस्त्यांचा प्रश्न आहे.हेळवी सारखी जमातही या लोकांपर्यंत कधी पोचलीच नाही.किमान त्यांच्याकडे तरी यांच्या नोंदी राहिल्या असत्या...
त्यामुळे दुरुन साजरं दिसणाऱ्या या जंगलात राहणाऱ्या या मनुष्यप्राण्याचं अस्तित्व असून नसल्यासारखंच....
विकासाच्या पोकळ गप्पा मारणाऱ्यांनी एकदा इकडं येवून बघावं की विकासाच्या प्रतिक्षेत एक विकास राहतोय...
(क्रमशः)
-
1 Comments
उत्तम वर्णन
ReplyDelete