नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असं सांगत न्यायालयानं आरक्षणाच्या अंमलबजावणीला तूर्तास स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. दरम्यान, यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आगेय राज्याच्या इतिहासातील आजचा दिवस हा काळा दिवस आहे. महाभकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवता आलं नाही असं म्हणत त्यांनी सरकारवर टीकेचा बाण सोडला.
“आमच्या सरकारनं आरक्षण दिलं. आरक्षण काही दिवस टिकलं परंतु आता स्थगिती मिळाली. आम्ही शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं. पण महाभकास आघाडीला ते न्यायालयात टिकवता आलं नाही,” असं पाटील म्हणाले. या प्रकरणाकडे आम्ही गांभीर्यानं लक्ष द्यायला सांगितलं होतं. परंतु अशोक चव्हाणांना ते जमलं नाही. सरकारनं आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. तामिळनाडूचं प्रकरणही खंडपीठाकडे आहे स्थगिती मिळाली नाही मग आपल्या सरकारला ते का नाही जमलं? असा सवालही पाटील यांनी केला. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यापैकी कोणी या विषयाकडे का लक्ष दिलं नाही. आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचंही ते म्हणाले.
“आता या प्रकरणाचा निकाल खंडपीठाकडे आहे. त्यामुळे काहीही केलं आंदोलन केलं तरी काहीही करता येणार नाही. हे आरक्षण कधीपर्यंत नाही हे आता सांगता येणार नाही. आम्ही कायम तयारी करा असं सांगायचो. पण प्रत्येक वेळी केवळ ट्विट करून सांगितलं जायचं. शासनानं अर्ज केला नाही. महाभकास आघाडीला हे आरक्षण नकोच होतं. आरक्षण स्थगित झालं नाही मिळालं तरी चालेल अशी मानसिकता त्यांची होती,” असा आरोपही त्यांनी केला.
0 Comments