आरटीओ कार्यालयाबाहेर सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

कोल्हापूर जिल्हा सध्या कोरोना संसर्गाच्या देशात आघाडीवर पोहचला आहे. रोजचे सुमारे ५०० ते ६०० रुग्ण सापडून कोल्हापूरने महाराष्ट्रात आघाडी घेण्यासाठीची वाटचाल सुरू केली आहे. दर १० लाख लोकसंख्येमागे होणाऱ्या मृत्यूदरात कोल्हापूर देशात क्रमांक एकवर पोहचल आहे. अशी भीषण परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र सरकारी कार्यालयाबाहेर आणि कार्यालयात अफाट गर्दी निष्काळजीपणे वावरतानाचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे.

कोल्हापूरचे आरटीओ ऑफिस म्हटलं की नेहमीच गजबजलेला परिसर म्हणून ओळख ठळक होते. पण सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात इथल्या गर्दीत वाढच झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 

बेजबाबदार नागरिक इथे आल्यानंतर त्यांच्याकडून अक्षम्य असे वर्तन पाहायला मिळते. कोणी मास्क लावत नाही, कोणी सोशल डिस्टनसिंग पाळत नाही, तर कोणी दिसेल तिथे पचकन थुकण्यात धन्यता मानत आहेत.

कार्यलयाच्या बाहेर असणाऱ्या अनेक टपऱ्यांवर सोशल डिस्टनसिंगला अक्षरशः हरताळ फासला आहे. लोकांना कोरोनाची जराही भीती उरली नसल्याचे चित्र इथे आल्यावर पाहायला मिळत आहे.
मात्र दुसरीकडे कारवाईच्या बाबतीत महानगरपालिका प्रशासनाची उदासीनता या ठिकाणी पाहायला मिळते. संबंध शहरभर कर्मचारी तैनात करून मास्क न लावल्याबद्दल दंड वसूल करणारे महानगरपालिका इकडे मात्र फिरकत नसल्याचे समोर येत आहे. 

यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करणे आवश्यक बनले आहे. तसेच बेजबाबदारपणे वागणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुद्धा अपेक्षित आहे.

Post a Comment

0 Comments