शेळी की शाळा!



✍️शरद बाबुराव कदम ( B.Sc .Agri )
डॉ.डी. वाय .पाटील कृषिमहाविद्यालय, तळसंदे , कोल्हापूर .

आई :   व्हय व , काय म्हणतीय मी
तात्या : बोल की ग 
आई :   पोरांच्या शाळचं बघा कधी भरत्यात 
तात्या :  बरं विचारतु कोणाला तरी , त्या गणू                       मास्तरला विचारून बघतो
आई :   कायनू म्हणत्यात ते मोबाइल कसला टचस्क्रीन 
            घ्या म्हणतोय नव्ह तो मास्तर 
तात्या :  बघतो म्या काय होतंय 
आई :    अहो तसं पण साळत नाही धाडणार     
            म्हणत्यात सगळी मायबाप पोरांची 
तात्या :   बरं मी बघतो , म्हणतोय की तुला
आई :    बघा जावा ..ती कार्टी फोन घ्या म्हणून माग 
            लागलिया अन हा बाबा असला माझ्या       
            नशिबाला .
तात्या :   कुठाय ती सोनी .
सोनी :    काय व तात्या !
तात्या :   काय म्हणतीया , कसला फोन ग , कशाला 
             लागतुया .
सोनी :    तात्या सगळ्या पोरींकडं हायत फोन मोठं 
             मोठं मला बारका तर घ्या की .
तात्या :    कशान घेती , आत्ता काय उरलाय ,  
             माझ्याजवळ फुटकी कवडी नाय.
सोनी :   काय पण करा पण मला पाहिजे तात्या फोन.
तात्या :   बरं बघतो राजाभाऊ देतोय का काय उचल 
            कामावर फेडीन त्याच म्या अन तुझी माय.
आई :    होय व मग त्या पोराचं पण बघा की कसला 
             तरी डबा सबा फोन घ्या त्याला पण 
तात्या :   कुठाय तेव बाळ्या 
आई :     गेला नव्ह शेळ्यामागं, शिळी भाकर खाऊन   
आई :     भाकरी करायाबकाय  हाय का घरात , 
तात्या :   आणतो मी उदार पादार दुकानाच सामान
तात्या:    दोघांत एक फोन घितो बघ सोने 
सोनी :    नाही तात्या मी नसते देत त्याला मी पण     
            कामाला जात नाही होय सुट्टीत माझा मला
            फोन पाहिजी म्या नसते देत बाळ्याला 
आई :     म्या तर म्हणत होती पोरीला मास्तरीन 
            करिन अन आत्ताच माझं तर हातपाय    
            गळाटलं .
तात्या :   आग मला तर कायीच कळणं झालंय बघ 
आई :    काय तर करून कसं- बसं दहावी काढू 
            म्हंजी झालं . 
हा संवाद काय चेष्टा नाही तर वास्तव आहे , माझ्या शेतकरी , मजूर अन कष्टकरी मायबापाचं  , त्यांच्या पोरांचं . जणू यांचं भवितव्य अंधारात दिसेनास झालंय. का घेऊ शकत नाही शेतकरी स्मार्टफोन , का एखादा मजूर घेऊ शकत नाही असा मोबाइल..
आहे ना गरज त्यांची मूलं  शिकवण्याची ,तरी देखील दुर्लक्षित ,  याला कारणीभूत आहे , आपली यांच्याकडे पाहण्याची भूमिका . कधीपर्यंत शेतकऱ्यांची मुलं शाळा सोडून शेळी च्या मागे वणवण फिरणार , कधी स्थिरावणार यांचं जीवन 
आज या कोरोना च संकट जगभर थैमान घालत आहे , इतक्या कठीण परिस्थितीत देखील शेतकरी दम धरून उभा आहे .आपल्या शहरात राहणाऱ्या बांधवांसाठी अन्न पिकवतो आहे .तरी देखील त्याची फरफट चालूच आहे. मग कसा घ्यायचा स्मार्टफोन , कसा करायचा नेट चा रिचार्ज , पोट भरण्यासाठी ची धडपड थांबेना , अन कसा मुलांना शाळेत घालणार शेतकरी बाप. 
 1 जुलै कृषिदिन म्हणून साजरा केला जातो .
खरं तर  शेतकऱ्यानं या दिवसाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करायला हवं , परंतु ही भावना , तो उत्साह कुठंतरी कमी दिसत आहे . जर कृषिप्रधान राष्ट्रांत  कृषिसंजीवनी सप्ताह साजरा करावा लागत असेल तर चिंतेची बाब आहे .  या मागची कारणं म्हणजे सदैव दुःखात असणारा माझा शेतकरी बाप , समाजाचं त्याच्या कडे असणारे दुर्लक्ष , शासनाची नुसती पोकळ आश्वासने , अन बरंच काही.
मग आलं आपलं राजकारण , ज्याला राजकारण हा शब्द काहीसा अनोळखी असतो , त्या राजकारणाच्या गजऱ्यात याला ओवलं जातं .मग शेतकऱ्यांच्या येणाऱ्या योजनांचा भ्रष्टाचार , कोणाची पोळी भाजून घ्यायची , यासाठी अजून हेवेदावे . सर्व काही आभासी जग …
खरोखर या राष्ट्राचा कणा असलेला शेतकरी सुधारला पाहिजे , त्या शेतकऱ्याची मुलं शिकली पाहीजेत , शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे ,अस नाही का ओ कधी वाटत .  अन कधी वाटणार , कधी जागी होणार ही भावना . संपायला हवं हे कुठंतरी , याला चाप लावायला पाहिजे .काही हात मदतीसाठी पुढे सरसावत आहेत परंतु , त्यांना देखील खडे मारण्याचे काम हे लोक करत असतात . शेतकरी काळाची गरज , समाजाचा अलंकार  , अन राष्ट्राचा अभिमान ..  असा विचार जोपर्यंत जोपासला जात नाही , तोपर्यंत  कृषिप्रधान भारत हा फक्त नावापुरता च असेल. 
निसर्ग कोणतं रूप धारण करेल सांगता येत नाही , कधी दुष्काळ , तर कधी महापूर , कधी गारपीट तर कधी न सहन होणारं ऊन ..या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा .शेतकर्यांच्या मालाला कवडीमोल भाव नसतो, तोच माल व्यापारी
 चढ्या दराने विकतात . कालपरवाच खराब बियाणं शेतकऱ्याच्या गळ्यात घालायचा प्रयत्न झाला , कोण आहे या सगळ्या गोष्टीना जबाबदार .जोपर्यंत आपण पुढे सरसावत नाही तोपर्यंत शेतकरी या जोखडातून बाहेर पडणार नाही.  एकत्र या , संघर्ष करा , शेतकऱ्यांची मुलं शाळा शिकली पाहिजेत .
शेतकऱयांची अवस्था अतिशय बिकट होत आहे , पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र कष्ट पडत आहे , अन शेतकरी जीवनाचा अगदी पोरखेळ चालू आहे .
जसं की 
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले

हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे..
शेकडो वेळा चंद्र आला,  तारे फुलले, रात्र धुंद झाली ..
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद  झाली …..
 संकल्प करूयात की , ज्या क्षेत्रात काम करीन त्या ठिकाणी नक्कीच मी शेतकरी या जगाच्या पोशिंद्यासाठी सतर्क असेन . अधिकारी झालोत तरी या माझ्या बापासाठी झगडत राहु . कृषिक्षेत्रात उंच भरारी घेयुयात , नवे संशोधन , नव्या योजनांचा स्वीकार आपल्या मायबापासाठी करूयात. अन अशी बिकट अवस्था होण्यापासून नक्कीच कृषिक्षेत्र वाचवूयात . या वर्षी योगायोग म्हणजे आषाढी एकादशी अन कृषिदिन देखील एकाच दिवशी आला आहे, विठुरायाच्या चरणी बळीराजा साठी प्रार्थना करूयात . 
"जोपर्यंत कृषिसंजीवनी  सप्ताह हा कृषियशोगाथा सप्ताह " होणार नाही ,
तोपर्यंत शेळी  की शाळा  हा प्रश्न मिटणार नाही . 


Post a Comment

0 Comments