मी व अचानक आयुष्यात घुसलेला कोरोना ; सचिन लोंढे पाटील यांचा कोरोना स्वानुभव

मार्चच्या शेवटी कोल्हापुरात कोरोनाचा शिरकाव झाला अगदी त्याच्या अगोदरपासूनच मी काळजी घेत होतो. कोल्हापुरात कोरोना येण्याअगोदर पुण्यात कोरोनाने आपला प्रभाव वाढविण्यास सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळात योग्य ती खबरदारी घेऊन पुण्याला एकदा जाऊनही आलो होतो.पण कोरोनाला आपल्या शरीरात येण्यापासून रोखून ठेवलं होतं.


कोल्हापुरात लॉकडाउन जस जा शिथिल होऊ लागलं तस तस रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली. माध्यम क्षेत्रात काम करत असल्यामुळे लोकांच्या संपर्कात येणे हे नेहमीचेच. पण तरीही सर्व प्रकारची दक्षता घेण्यात माझ्याकडून काहीच दिरंगाई होत नव्हती...किंबहुना मी स्वतःला तशी संधीच देत नव्हतो. यामुळे कोरोना हा काही घरापर्यंत पोहचणार नाही खात्री होतीच.

पण २४ ऑगस्ट ला संध्याकाळी अचानक ताप आला व थंडी वाजू लागली. त्याअगोदर दोन तीन दिवस पावसात भिजल्यामुळे मला वाटलं की यामुळेच ताप आला असावा. किंबहुना पॅरासॅटेमोल घेतल्यानंतर सकाळपर्यंत ताप गायब सुद्धा झाला. हे पाहता पुन्हा एकदा निश्चिन्त झालो. पण मनात थोडी भीती होतीच. यानंतर देखील सर्व ती खबरदारी घेणे सुरूच होत. पण २६ ला अचानक घशात खवखव सुरू झाली आणि काहीतरी नक्कीच वेगळं घडत आहे याची जाणीव झाली. त्याच दिवशी स्वतःला कुटुंबापासून अलग करून घरातीलच वरच्या एका खोलीत वेगळं राहू लागलो.

दुसऱ्या दिवशी आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये जाऊन घशातील स्त्राव चाचणीसाठी दिला. अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ तारखेला सायंकाळी महानगरपालिका प्रभाग सचिवांकडून फोन आला की तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे.त्या दिवशी प्रशासनाकडून चौकशी साठी तब्बल १० फोन आले असावेत.प्रशासन आपल्या नागरिकांची किती काळजी घेते हे त्या दिवशी अनुभवलं. काही वेळात घरच्यांना ही बातमी समजताच पहिल्यांदा विचलित झालेले कुटुंबीय नंतर मात्र धैर्याने एकवटून माझ्या पाठीशी उभे राहिले.

थोड्याच वेळात प्रभाग सचिवांनी येऊन सर्व त्या सूचना दिल्या. कशा पद्धतीने उपचार घेणार याची विचारणा केली.घरीच सर्व सोय आहे म्हटल्यावर त्यांनी लगेचच परवानगी दिली आणि एका वेगळ्याच पर्वाची सुरुवात झाली.लक्षणे तीव्र नसल्यामुळे व काही त्रास नसल्यामुळे घरीच उपचार घेणे मला योग्य वाटले होते.याच दिवशी प्रभागातील नगरसेवक श्री किरण नकाते यांनी फोनवरून विचारपूस करून सर्व प्रकारची काळजी घेण्याची व काही लागलं तर आवश्यक कळवा असेही सांगितले.

दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधून एक सिस्टर केएमटी मधून घरी आल्या व त्यांनी एक मेडिकल किट माझ्याकडे दिल. यात काही मास्क, सॅनिटायजर, औषधे आणि महत्वाचं म्हणजे ऑक्सिमीटर इत्यादी साहित्य होते. सर्व त्या सूचना देऊन बस माघारी निघून गेली.

त्याच दिवशी सोशल मीडियावर माझ्या या आजाराची माहिती मित्रवर्य व नातेवाईक यांच्यापर्यंत पोहचवली.कारण फक्त एकच की, संक्रमणाच्या दिवसात माझ्या संपर्कात जर कोणी आलेलं असेल तर त्यांनीही त्यांची लवकरात लवकर चाचणी करून स्वतःला व त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावं.यानंतर अनेक मित्रांनी, माध्यम क्षेत्रातील वरिष्ठांनी, समवयस्क सहकाऱ्यांनी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी फोन व मेसेजेस मधून सकारात्मक ऊर्जा दिली व लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आता खरी सुरुवात होती...एका अनोळखी विषाणूविरुद्ध युद्धाची. रोज सकाळी उठल्यावर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे, यानंतर कोमट लिंबू पाणी घेणे, औषधे घेणे, यानंतर सुमारे १० मिनिटे गरम वाफ घेणे असा नित्यक्रम सुरू झाला. रिपोर्ट आल्याच्या दुसऱ्याच दिवशी तोंडाची चव आणि नाकाचा वास गायब झाला. अचानक हे जाणवल्यामुळे थोडं घाबरलो,पण आमचे मित्र डॉ चेतन परब यांनी धीर दिला व हे कोव्हीडचे सामान्य लक्षण असल्यामुळे घाबरू नको असा मोलाचा सल्ला दिला.

डॉ पिनाक खारकांडे व नायब तहसीलदार डॉ सुनील लोंढे सर यांनी वेळोवेळी वैद्यकीय सल्ला देऊन एकप्रकारे मला मानसिक इम्युनिटी बूस्टर दिला. पुण्याचे आमचे मित्र व जेष्ठ श्री पांडुरंग कुंभार यांनी देखील आपल्या खास शैलीत मला मानसिक बळ दिले व लवकरात लवकर यातून बाहेर पडशील असा आशावाद व्यक्त केला.

दरम्यानच्या काळात एक गोष्ट जी तुम्ही आम्ही आपण सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. ती म्हणजे 'ऑक्सिमीटर' ने ऑक्सिजन पातळी तपासणे. दर तासाला मी माझी ऑक्सिजन पातळी तपासात होतो. ही पातळी ९० ते १०० च्या दरम्यानच राहील यासाठी सतत दक्ष राहायचो. रोज सकाळी उठल्यावर साधारण १५ मिनिटे मी प्राणायाम करण्यावर जास्त भर द्यायचो. यामुळे स्वच्छ हवा तर शरीरास मिळायचीच पण फुफुसांची शक्ती देखील वाढायची.

जेवणात कडधान्ये, व्हिटॅमिन सी यूक्त पदार्थ, प्रोटीन साठी अंडी यासारख्या घटकांवर भर असायचा. आपसूकच यातून कोरोना विरुद्ध जी प्रतिकारशक्ती हवी असायची ती या जेवणातून मिळायची. बाकी फळांवर सुद्धा तितकाच भर असायचा. तोंडाची चव गेल्यामुळे अन्न नकोस वाटायचं. पण भरपेट खाशील तर बरा होशील हे डॉक्टर लोकांचे बोल आठवायचे आणि घशाखाली अपोआप घास उतरायचे. नेहमी कोमट पाणी प्यायल्याने घसा नेहमी गरम राहायचा.आणि ते आवश्यक होतच.

साधारण ५-६ दिवसानंतर अधिकची दक्षता म्हणून डॉ वोरा यांच्याकडे दाखवून घेतलं. सर्व काही नॉर्मल होत. तरीही योग्य उपचार घेणे आवश्यक होतं. म्हणूनच त्यांची ट्रीटमेंट सुरू केली. ती ही घरी राहूनच मी घेत होतो.

आज तब्बल १६ दिवसानंतर हे सर्व उपचार पूर्ण करून आज मी ठणठणीत बरा झालेलो आहे.या दरम्यान अनेकांनी मला जे जे फोन केले, मॅसेजस केले या सर्वांनी फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जा व मानसिक बळ दिले. आमच्या शेजाऱ्यांनी देखील तितकीच मोलाची मदत केली. काही घरगुती सामान लागले तर एका हाकेवर अनेकजण दारात उभे राहिले. महानगरपालिका आरोग्य विभागाकडून व प्रशासनाकडून वेळोवेळी फोन करून तब्येतीची विचारपूस करण्यात येत होती. या सर्वांच्या सहकार्याने आज मी कोरोना मुक्त म्हणून पुन्हा नव्याने उभारी घेत आहे. हे नक्कीच माझ्या एकट्याचे यश नसून वरती उल्लेख केलेल्या सर्वांचे यश आहे.

सकारात्मक दृष्टिकोन, त्वरित निदान, वेळेवर उपचार, योग्य आहार आणि स्वतःची काळजी या पंचसूत्रीचा अंमल केला तर आपण नक्कीच यातून यशस्वीपणे बाहेर पडू शकतो.

● कोरोना लक्षणे-

ताप, सर्दी, घशात खवखव, डोकं गच्च होणे, तोंडाची चव जाणे, नाकाला वास न येणे.

● कोरोना चाचणी-

शासनातर्फे सीपीआर, आयसोलेशन हॉस्पिटल व आता शहरातील १० कुटुंब कल्याण केंद्रामधून घशातील स्त्रावाची मोफत चाचणी होते.

तर काही खाजगी लॅब मधून सुद्धा १५०० ते २००० रुपये घेऊन चाचणी करता येते. पण माझ्या अनुभवावरून या चाचणीचा अहवाल येण्यास थोडा वेळ लागतो.

● उपचार-

लक्षणे तीव्र नसतील व घरात वेगळं राहण्याची सोय असेल तर घरीच राहून उपचार घेणे. मात्र यासाठी प्रशासकीय यंत्रणेस माहिती देणे आवश्यक आहे.

लक्षणे अतितीव्र असतील तर वेळ न घालवता योग्य उपचारासाठी लवकरात लवकर चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास प्राधान्य द्यावे. मात्र हे करत असताना सर्वप्रथम त्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत की नाही याची चौकशी करूनच रुग्णास घेऊन जावे. जेणेकरून रुग्णाची व नातेवाईकांची धावपळ होणार नाही.व रुग्णांवर भीतीने दबाव येणार नाही.

बेड उपलब्ध हेल्पलाईन क्रमांक-

- 9356716563
- 9356732728
- 9356713330
- 0231 2541500 (सीपीआर)

● आवाहन-

कोरोना हा जरी भयंकर आजार असला तरी वेळेत निदान झाल्यास व वेळेवर उपचार झाल्यास आपण यातून ठणठणीत बरे होऊ शकतो. तसेच आपल्या मुळे आणखी संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या आजारास सामोरे जाऊया. स्वतःची व स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घेऊया. घाबरून न जाता आपण या कोरोनविरुद्ध लढा उभारूया. विशेषतः तरुणांनी काळजी घेणं आवश्यक आहे. कारण तुम्ही यातून लवकर बरे होऊ शकता, पण तुमच्यामुळे घरातील वृद्ध लोकांना व इतर आजारांनी ग्रस्त व्यक्तींना धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे आता येणारा काळ हा तरुणांच्या हातात आहे एवढं लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

मास्क वापरणे, सॅनिटायजर वापरणे व सुरक्षित अंतर बाळगणे हा एकमेव उपाय कोरोनावर प्रभावी ठरू शकतो.

- सचिन लोंढे पाटील

{ टीप- सदरची पोस्ट ही फक्त जनजागृती या एकाच हेतूने प्रेरित असून यातून कोणत्याही प्रकारे वैयक्तिक प्रसिद्धीचा हव्यास नाही.}





Post a Comment

0 Comments