आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर भारतीय संघाचा सिक्सर किंग युवराज सिंग ऑस्ट्रेलियातील बीग बॅश लीग (BBL) लीगमधून मैदानात उतरण्याच्या तयारीला लागला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याच्यासाठी संघ शोधत असल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयशी संलग्नित असताना ऑस्ट्रेलियन बोर्डाच्या लीगमध्ये सहभागी होता येत नाही. त्यामुळे आतापर्यंत भारतीय पुरुष संघातील कोणताही खेळाडू ऑस्ट्रेलियन लीगमध्ये खेळलेला नाही.
सिडनी मॉर्निग हेरॉल्डने युवराज सिंगचे मॅनेजर जेसन वॉर्न यांचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलिया युवीसाठी बीग बॅश लीगमध्ये संघ शोधत आहे. २००७ मधील टी-२०विश्वचषक आणि २०११ च्या विश्वचषकात युवीने लक्षवेधी खेळ केला होता. २०१७ मध्ये युवी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर २०१९ मध्ये भारतीय संघ इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा खेळत असताना युवीने निवृत्तीची घोषणा केली होती.
युवीच्या नावे ३०४ वनडेमध्ये ८७०१धावा आणि १११ विकेट आहेत. त्याने ४० कसोटीसह ५८ टी २० मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. बीबीएल क्लब त्याला संघात सामील करुन घेण्यासाठी म्हणावी तशी उत्सुकता दाखवत नसल्याचेही चित्र आहे.
0 Comments