"मराठवाड्यांचा इतिहास व भविष्य"


✒️विकास गोडगे

मराठावाडा नावात अस्मिता आहे. लेट्स एक्सेप्ट त्यात मराठा नाव आहे म्हणुन ती अस्मिता अजुन टोकदार झाली आहे.  त्या अस्मितेचा मी साक्षीदार आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या काळात ती अस्मिता मी फक्त पाहीलेली नाही तर ती टिकुन कशी राहीन यासाठी फुल नाही फुलाची पाकळी वाहीलेली आहे. सरंजामशाही आपल्या रक्तात आहे, म्हणजे आपण सरंजाम नसलो आणि फक्त सरंजामदारांचे ओझे आपल्या डोक्यावर वाहणारे सामान्य शेतकरी असलो तरी त्या सरंजामदारीचा माज आपल्या रक्तात भिनलेला असतो.  आणि जिथे जिथे ही सरंजामशाही किंवा भुतकाळातील सरंजामशाहीचे फाटके अवशेष अंगाखांद्यावर अभिमानाने बाळगणारे दिसतात ते प्रदेश मागास म्हणुन ओळखले जातात.  उदाहरणार्थ बिहार, उत्तर प्रदेश, मराठवाडा वगैरे. तरीपण एक भौगोलिक सलगता आणि परंपरा वगैरे आपल्याला बांधुन ठेवतात आणि आपण त्याचा स्वातंत्र्य दिन वगैरे साजरा करतो. कारण अस्मिता टिकवण्यासाठी आणि वाढवन्यासाठी त्याची गरज असते. निजामशाहीत मराठवाड्यात सर्वात सुखाने नांदनारे कोण असतील तर ते वतनदार लोक. मराठा आणि ब्राम्हण वतनदार पाटील देशमुख कुलकर्णी.  निजामशाही गेल्या नंतर सत्तेत कोण बसलं तर हेच वतनदार पाटील देशमुख आणि कुलकर्णी. आणि आजकाल हेच लोक मराठावाडा मुक्ती दिन जोरदार साजरा करताना दिसतात. 

तरीपण आपल्या नेनीवेत त्या भौगोलिक सलगते विषयी आणि राजकीय परंपरेविषयी सुप्त आकर्षण असतं.  मराठवाडा स्वंतंत्र होऊन पण मागास का राहीला, त्याचाच भाग असलेला तेलंगणा स्वतंत्र होऊन पण मागास राहीला अणि ती सल किंवा त्याविषयी बंडखोरीची भावना असते.  मी हैदराबादला असताना आणि हैद्राबाद हे तेलंगणात असताना तिथे सगळा आंध्र मधल्या लोकांचाच भरणा असायचा. स्वतंत्र तेलंगणाची चळवळ जोरात असल्याने चर्चा व्हायची आणि सगळे तेलगु पोरं पोरी चंद्रशेखर रावला शिव्या द्यायचे, आणि मी तेलंगणाची रास्त भुमिका मांडायचो. त्यांना हे समजायचं नाही कि हा मराठी मुलगा तेलंगणाची बाजु एवढी जोरकस का मांडतोय, पण मला तेलंगणा आणि तिथले लोक भाऊ वाटायचे. एकाच भौगोलिक आणि राजकीय व्यवस्थेत पिचलले लोक. पण सगळे कलिग इंजिनियर असल्याने त्यांना ते समजावं एवढी अक्कल नव्हती. कोडींग आणि मोदि भक्ती सोडून तेवढा अभ्यास कोण करनार? 
तर खरा मुद्दा पुढे आहे. तर एका गुजराती पुढार्याने मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त केला आणि भारताला जोडला. तेलंगणा पण मागे राहीला अणि मराठवाडा पण मागे राहीला. आता वर्षानुवर्षे आम्ही मराठवाडा मुक्त करण्यासाठी रक्त सांडले ह्यचे नुसतेच  पोवाडे गात बसन्या पेक्षा मराठावाडा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आघाडीवर मागे का राहीला याचा विचार करण्याची गरज आहे.  खोट्या अस्मिता पडलेल्या गढ्यांच्या आणि वाड्यांच्या दगडमातीत पुरुन भविष्याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.  शेतकर्‍यांच्या म्हणजे तथाकथित सरंजामदारांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी शेतीवरील भार कमी कसा करता येईल, शिक्षणातुन आधुनीक विचार घेऊन पुढे कसं जाता येईल,  मराठवाड्यातुन पश्चिम महाराष्ट्रात होनारे स्थलांतर बंद होऊन देशातुन मराठवाड्यात स्थलांतर कसे होईल याचा विचार करायला हवा.  त्यासाठी गरज आहे उच्च शिक्षणाची, आधुनिकतेची, पुरोगामित्वाची...

नाहीतर मराठवाड्यातील गरीब मुसलमानांच्या पुढच्या कित्येक पिढ्या भुतकाळातील निजामी राजवटीचा दुखवटा पाळन्यात जातील आणि सरंजामदारांच्या अस्मिता पाळत पाळत तिथल्याच काळ्या मातीत खपतील.

Post a Comment

0 Comments