क्षण आठवणीतले...जगताना नव्याने जगायला लावणारे


भाग- २
     
✒️सागर सोमाजी माने (मास्टर ऑफ जर्नालिझम)
संचालक:श्री हालमत सांप्रदाय मंडळ,कुपवाड ,सांगली

२०१९ मार्च महिना सकाळी प्रा.म्हस्के सरांचा फोन आला.मला वाटलं असच खुशाली विचारायला केला असावा.पण सरांच बोलणं आयकताना सुखद धक्का बसला.कारण ही तसेच होते. सागर भाऊ ,"आपल्या ग्रंथाचे काम अगदी अंतिम टप्यात आहे.९० % काम पूर्ण झालंय.फक्त किरकोळ करेक्शन आणि छपाई बाकी आहे".मनाला खूप बर वाटल कारण मराठी मध्ये आता मला आणि आपणा सर्वांना या श्री बिरोबा या लोकदेवतेचे चरित्र वाचावयास मिळणार होते. 
          
मित्रांनो ज्या धनगरी मौखिक परंपरेने या लोकदैवतांचा इतिहास अजरामर ठेवला,त्या ओवीकार लोकांच्या जीवनामधली आजही परवड संपलेली नाही.कारण संत म्हणतात,                    

"पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा,                                जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे"                               
 एक ओविकारच त्यासाठी तुम्हाला व्हावं लागलं. या धकाधकीच्या जीवनामध्ये आपला वेळ अमूल्य आहे.पण हेच ओविकार लोक आपल्या कार्यक्रमामध्ये रात्रभर जागून आपणास भक्तिरुपी सागरात मनसोक्त फिरवतात.आपणास यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.जगण्याला नवा आयाम मिळतो.आपल्या जीवनात नवचैतन्य निर्माण होते.पण ओवीकाराना  काय मिळतं??.समाजाची वाईट हेटाळणी,प्रपंचाची काळजी ,बायको -मुलांची बोलणी,आई -वडीलांच्या शिव्या एवढं काय कमी आहे काय म्हणून  जागरणामुळ भूक मंदावणे,पित्त ,छातीत दुखणे,थकवा येणे असली आजारपण देखील पाठ सोडत नाहीत.अशा सगळ्या गोष्टी पचवत ओविकार स्वतः काट्यावर चालून जगाला भक्तिरूपी सुगंधित फुले वाटत असतो. हदयात दुःख साठवून जगाला सुखाची खिरापत देत असतो. 

ओवी गाताना भिजतया सार आंग ,                            तुझ्या भक्तीत झालो आम्ही समदी दंग,                        देवा व्यथा तुला कधी समजल का सांग,             
कधी फिटलं माझ्या जन्माच या पांग!
       
हा त्याग कधी समजल या लोकांना.ओवी म्हणणाराच कधी चांगलं नाय व्हायचं.. हे शब्द तर काळजात घर करून बसतात. असो ज्याच्या त्याच्या बुद्धीचा भेद .हा मौखिक इतिहास या लोकांनी जिवंत ठेवला.म्हणूनच आपण सर्वांना या वीर दैवतांचा जन्म,पराक्रम,परंपरा ह्याची माहिती मिळते.हा इतिहास त्यांनी जीवापाड जपला ..काय गुन्हा केला का हो? आज कालच्या कलेला आणि कलाकारांना मोठ मोठी व्यासपीठ उपलब्ध होतात.पण आजही माझी धनगरी ओवी या सर्वापासून खूपच लांब आहे.नेमक याला काय म्हणावं दुर्लक्ष की दूजाभाव . कसं आहे ?दुष्टीचा इलाज करता येतो दृष्टिकोनाचा नाही.
           
नेमके सरांनी हेचं हेरले.या लोकदैवता वर अत्यल्प प्रमाणात लिखाण झालं आहे. जे आहे ते मौखिक भरपुर आहे.पण तिथं पर्यंत आपणास पोहचलं पाहिजे.इतिहासाचा मिळवण्याचा सगळ्यात मोठा स्रोत हे ओवीकार आहेत.त्यांच्या चर्चेमधून सरांनी भरपूर माहिती घेतली. हुलजंती, आरेवाडी, घोडगिरी , येणकी,खिद्रापूर, पट्टण कोडोली ,अ.लाट,इंगळेश्र्वर, उदगाव,अर्जुनवाड, येलूर, कुरळप. आणि  सरांच्या नाशिक नगर भागातील काही वाण ओवी गाणारी त्यांची गुरु मंडळी पुजारी यांच्या ओवीचा संग्रह करून  नावा सहित ते ग्रंथात छापले आहे.
        
वरचेवर सरांचे फोन यायचे .आता जुलै महिना आला होता.ग्रंथ छापून आता थोड्याच दिवसात हातात येणार होता. प्रकाशन सोहळा कसा असावा ह्याची चर्चा चालू होती .एके दिवशी सर म्हणाले "सागर भाऊ आपल्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा *ना भूतो ना भविष्यतीss*...असा झाला पाहिजे.तुम्ही सगळी या सोहळ्यासाठी आल पाहिजे." सरांनी फोन ठेवला.पण सरांचे वाक्य कानी घुमू लागले "ना भूतो न भविष्यती ..."काय करावं बुवा यायाठी.त्यावेळी रात्र सगळी विचारातच गेली.सकाळी गावातील श्री बिरदेव मंदिरातून देव दर्शन करून आलो..तेव्हा डोक्यात एक विचार आला की,इतर प्रकाशन सोहळ्यामध्ये भरपूर लोक साक्षीदार असतात.पण या सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष आपला बिरोबा असावा म्हणजे त्यांची आपण पालखी न्यावी.म्हणजे प्रकाशन सोहळ्या बरोबर संस्कृती संवर्धन,परंपरा,गाठी भेटी यांचे आदान प्रदान होईल.शिवाय ओळख वाढून या देवाच्या प्रचार प्रसार कामास गती येईल.

मुद्दा मनाला पटला.लगेच सरांना फोन करून विचार सांगितला. "सर आपल्या या प्रकाशन सोहळ्याला आपण आपल्या देवाला नेल तर ओ...." "म्हणजे ?थोड सविस्तर सांगा सागर भाऊ" सर बोलले.सर या सोहळ्याला आपण श्री बिरोबा देवांच्या पालखी नेऊया.हा शब्द बोलताच सरांनी लगेचच होकार दर्शवला.पण कोणत्या कोणत्या??पुन्हा आम्ही गोंधळलो. माझे उदगाव आणि अर्जुनवाड या गावामध्ये अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते.त्या गावाच्या कारभारी लोकांना मी नाशिकला पालखी न्यायची कल्पना दिली.त्यांनी अगदी मोठ्या आनंदाने होकार दिला.कारण देव असाच नाही वाढत.त्याला वाढवणारा समाज एक असणं गरजेचं असतं.                   .                                             

झालं नियोजन दोन पालख्या न्यायचं.पण देवाच्या मनात वेगळच काहीतरी होत.                                                            

आले देवाजीच्या मना,                        
तिथे कोणाचे चालेना!                          

माणुसकी नावाचे रसायन साच्यात ओतून तयार केलेला एक पुतळा म्हणजे आमचे व्हनवाडचे नामदेव(मामा)करळे.त्यांची आणि सरांची मैत्री माझ्यापेक्षा पण जुनी.त्यांनी एक दिवस फोन केला आणि  नाशिकला जाण्याचं नेमके कस नियोजन आहे हे मला विचारू लागले.मी सगळ सांगितलं नियोजन.पण मामा बोलले "सागर आपण एक काम करू ,नाशिकला आपल्या घोडेगिरीच्या देवाची पालखी नेऊ.
सरांना तसा फोन करून सांगितले.सर म्हणाले खरच हा दुग्धशर्करा योग आहे .कारण या दोडीच्या म्हाळोबाने घोडेगिरीच्या बिरोबाची अतिशय भक्तीभावाने सेवा केली होती.सत्ययुगामध्ये त्या गुरु-शिष्यााची भेट झाली होती.त्यांची सेवा करून म्हाळोबा मोक्षपदास गेले आहेत.परत एकदा ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने या कलियुगात भेटीचा सोहळा आपणास पाहता येईल.शिवाय घोडेगिरीच्या देवाचे आमच्या गावास ही पाय लागतील ही त्या प्रयोजना मागणी सुप्त भावना.सरांनी अगदी लगेच होकार दिला.
              
नामदेव मामा आणि मी भंडारा वाटी देण्यासाठी घोडेगिरी (ता.चिक्कोडी) येथे गेलो.भंडारा वाटी देणे म्हणजे आमंत्रण देण्याची धार्मिक पद्धत  होय.आता सगळ आल हे मोबाईल ,पत्रिका ,मेसेज,कुरियर.  पण पहिल्या पासून भंडारा वाटी म्हणजे एक आर्धी खोबऱ्याची वाटी आणि त्यात थोडा भंडारा घालायचा. व ती वाटी त्या मानकरी जवळ किंवा पुजारी यांच्या जवळ द्यायची.ही झाली देवाला बोलवण्याची जुनी पद्धत. श्री अन्नाप्पा पुजारी (उदगाव) हे त्यांच्या कामानिमीत्त चिक्कोडीला आले होते.ज्येष्ठ आणि जाणकार व्यक्ती म्हणून त्यांना आम्ही फोन करून बोलवून घेतले.भंडारा  वाटी देताना सगळ बोलणं झालं.एकतर तो भाग पूर्ण कन्नड बहुल.मराठीचा मागमूस ही नाही.पण दोन्ही भाषा येणारे नामदेव मामांनी सगळी बाजू सांभाळली.देवाचं दागिन,एवढ्या लांबचा प्रवास,पालखीला वाहणारी लोक,आमच्या परंपरा ,आमचा मानपान अशा अनेक शंका वजा अडचणी आम्हास सांगितल्या.पण देवाच्या मनात यायचे असल्यास पुजारी तर कसे नाही म्हणणार.त्यांच्या सगळ्या शर्थी मान्य केल्या.त्यामध्ये मामांचे  घोडेगिरीचे मित्र शिवू यांची खूप मदत भंडारा वाटी देताना झाली.शेवटी त्यांनी आंमत्रणाची भंडारा वाटी धरली. इकडे दोन्ही देवांना मी भंडारा वाट्या दिल्या.
 
क्रमशः...
पुढील भागात..
 २०/०९/२०१९ गुरु बिरोबा देवांच्या तिन्ही(उदगाव,अर्जुनवाड, घोडेगिरी) पालख्यांची उदगाव येथे भेट तेथून पुढे दोडी बू.नाशिककडे प्रस्थान
      
        

Post a Comment

1 Comments