पंढरपूर/प्रतिनिधी:
राज्यभर "ढोल बजाव, सरकार जगाव" हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आहे. राज्यभरात धनगर समाज वेगवेगळ्या पातळ्यांवर हे आंदोलन करेल आणि समाजानेही या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला जागे करावे, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. ते पंढरपूर येथे आंदोलनाच्या तयारीच्या पहाणीसाठी आले होते.
तसेच आरक्षणाच्या मागणीला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून २५ सप्टेंबर रोजी आपण पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल मंदिरासमोर स्वतः ढोल वाजवत सरकार विरोधात हे आंदोलन करणार असल्याचे आमदार पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमधून राज्य सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. गेल्या दहा महिन्यांपूर्वी सरकार सत्तेत मध्ये आलेले आहे. मात्र, धनगर आरक्षणाच्या बाबतीत एक पाऊलही सरकारने उचललेले नाही, तर भाजपा सरकारने सत्तेत असताना धनगर समाजासाठी एक हजार कोटींची तरतुदी केली होती. मात्र, त्यामधील एक रुपया सुद्धा या सरकारने दिला नाही. याशिवाय धनगर आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका ही सरकारकडून घेण्यात आली नाही, त्याबरोबर धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनाही आपण पत्र पाठवून तातडीने आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्याची मागणी केली होती.
मात्र, सरकारकडून धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत दुजाभाव होत आहे, त्यामुळे आता समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून येत्या २५ सप्टेंबर रोजी कुंभकरणाप्रमाणे झोपी गेलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे आ. पडळकर यांनी सांगितले.
0 Comments