पंढरपूर /प्रतिनिधी : तब्बल सात महिन्यानंतर मंदिर परिसरात आज भाविकांची गर्दी झाली. मास्क आणि सोशल डिस्टन्सचे पालन करत वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात नगरप्रदक्षिणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी आणि खासगी वाहतूक सुरु झाल्यामुळे अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या निमित्ताने आज शेकडो वारकऱ्यांनी पंढरपुरात येऊन श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले.
कोरोनाच्या भितीमुळे १७ मार्चपासून येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद आहे. एसटी आणि खासगी वाहनांवर देखील निर्बंध होते. त्यामुळे यंदा चैत्री आणि आषाढी, यात्रा भरु शकल्या नाहीत. अधिक महिना सुरु झाला असला तरी शासनाकडून अद्याप निर्देश आलेले नसल्यामुळे मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जात नाही. यात्रा काळात आणि दररोज येणाऱ्या भाविकांकडून होणाऱ्या खरेदीमुळे येथील बाजारपेठेत उलाढाल होत असते.
_________________________________________
(Advertise)
__________________________________________
दरम्यान, आता एसटी आणि खासगी वाहनांची वाहतूक सुरु झाली असल्याने आज अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या निमित्ताने शेकडो भाविक येथे आले होते. शेकडो वारकऱ्यांनी मास्क लावून सोशल डिस्टन्सचे पालन करत टाळ मृदंग वाजवत आणि हरिनामाचा जयघोष करत नगरप्रदक्षिणेचा सोहळा केला. कोरोनाचा वाढता संसर्ग थांबून लवकरात लवकर मंदिरात जाऊन विठूरायाचे दर्शन घेण्याची संधी मिळू दे, असे साकडे घातल्याचे अनेक भाविकांनी सांगितले.
0 Comments