नुकताच आयसोलेशन हॉस्पिटलला लागून असलेल्या एका प्रभागातील एका महिलेने तिचा कोरोना चाचणी नमुना आयसोलेशन हॉस्पिटल येथे दिला होता. या महिलेचे पती कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे व त्या महिलेस सुद्धा तशीच लक्षणे दिसून आल्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी स्वतःचा चाचणी नमुना आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये दिला होता.
चाचणीसाठी नमुना दिल्यानंतर एका दिवसात तसा अहवाल प्राप्त होतो. तसेच जर अहवाल पॉझिटिव्ह आला तर संबंधित व्यक्ती ज्या प्रभागात अथवा गावात राहते त्या ठिकाणच्या स्थानिक यंत्रणेमार्फत संबंधित रुग्णास फोनवरून तशी कल्पना दिली जाते. तर अहवाल निगेटिव्ह आल्यास कोणत्याही प्रकारचा संपर्क या यंत्रणेकडून साधला जात नाही.
मात्र आजअखेर त्या महिलेचा अहवालाच प्राप्त न झाल्यामुळे संबंधित महिला व तिचे कुटुंबीय द्विधा मनस्थितीत आहेत.तसेच त्यांनी याबाबत आयसोलेशन रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता तिथून सकारात्मक उत्तर देखील देण्याचं टाळलं गेलं. तरी सावधगिरी म्हणून त्या महिलेने घरीच अलगिकरनात राहून उपचार सुरू केले आहेत.
एकीकडे कोरोना चाचणीसाठी नमुना देऊन गायब होणारे नागरिक प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहेत तर दुसरीकडे कोरोना चाचणी अहवालाच गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित महिला जागरूक असल्याकारणाने त्यांनी स्वतःहून अलगिकरनात राहून उपचार सुरू केले आहेत, मात्र या ठिकाणी कोणतेही लक्षणे नसलेला दुसरा रुग्ण असता तर तो अहवाल निगेटिव्हच आला असेल या गैरसमजात मोकाट फिरला असता आणि समूह संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरला असता.
0 Comments