....फक्त रिक्षाचालकांचेच मोबाईल चोरणारा 'हा' तरुण, पोलिसांनी केली अटक; कारण वाचून व्हाल हैराण


पुणे ; पुण्याच्या कॅम्प परिसरातून पोलिसांनी एकाला मोबाईल चोराला अटक केली आहे. विशेष म्हणजे हा चोर फक्त रिक्षाचालकांचेच मोबाईल चोरायचा. फक्त रिक्षाचालक यांचे मोबाईल चोरण्याचे कारण ऐकून हैराण व्हाल असे आहे, प्रेयसी रिक्षाचालकासोबत पळून गेल्यामुळे सर्व रिक्षाचालकांचा सूड घेण्यासाठी फक्त रिक्षाचालकांचे मोबाईल चोरायचा असे त्याने पोलिसांच्या चौकशीत सांगितले.

आसिफ उर्फ भूराभाई अरिफ शेख (मूळ, रा. अहमदाबाद) असे त्याचे नाव आहे. आसिफला आपल्या प्रेयसीसोबत लग्न करायचं होतं. लग्नाला घरातल्यांचा विरोध असतानाही त्याने अहमदाबादमधील आपलं रेस्टॉरंट विकलं आणि गेल्या वर्षी जून महिन्यात प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पुण्यामध्ये पळून आला. प्रेयसीसोबत लग्न करुन पुण्यात नवीन बिजनेस व नवं जीवन सुरू करण्याचा त्याचा विचार होता. पण दोन दिवसांमध्येच ती तरुणी आसिफकडील पैसे व अन्य सामानासह पुन्हा गुजरातला पळून गेली. 

तिचा शोध घेत आसिफ गुजरातला पोहोचला, पण तिने एका रिक्षाचालकासोबत लग्न केल्याचं त्याला कळलं. त्याला मोठा धक्का बसला. आसिफ पुन्हा पुण्याला आला आणि कोंढव्यात राहणाऱ्या त्याच्या एका दूरच्या नातेवाईकासह काम करण्यास सुरुवात केली. पण त्याच्या मनात रिक्षाचालकांबाबत कटुता निर्माण झाली होती. त्यामुळे रिक्षाचालकांना धडा शिकवण्यासाठी त्याने त्यांचे मोबाईल चोरायला सुरूवात केली. आसिफ कात्रज, कोंढवा, कॅम्प अशा परिसरात रिक्षाने प्रवास करायचा. गर्दीच्या ठिकाणी जाऊन रिक्षा थांबवल्यावर आपला मोबाइल खराब असल्याचं सांगत तो रिक्षाचालकाकडे मित्राला फोन करण्यासाठी त्याचा मोबाइल मागायचा. नंतर फोनवर बोलण्याचा बहाणा करत रिक्षापासून काही अंतर चालत जाऊन पळून जायचा.

 त्याच्याकडून १२ मोबाइल हस्तगत करण्यात आले असून आतापर्यंत त्याने शहरातील ७० पेक्षा जास्त रिक्षाचालकांचे मोबाईल चोरल्याचं चौकशीत पोलीस चौकशीत  समोर आलं आहे.

Post a Comment

0 Comments