" महाराष्ट्र पोलिसांविषयीचा संशय निरर्थक"; डॉ. प्रभाकर माने यांचा विशेष लेख

🖋️ प्रा.डॉ. प्रभाकर तानाजी माने
प्रमुख, अर्थशास्त्र विभाग 
जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर    

-----------------------------------------------

या देशाच्या  सर्वोच्च न्यायालयाने मूळचा बिहारचा नागरिक असलेला सिनेकलाकार सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास  सीबीआयकडे देण्याचा निर्णय दिला. या निकालानंतर या देशातील प्रसारमाध्यमाकडून तात्काळ व नेहमीप्रमाणे जणू काही आपल्या देशाने पाकिस्तानचा एक भाग जिंकल्याचा आव आणण्याचा प्रकार माध्यमाने सुरू ठेवला आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाला सर्वोच्च न्यायालयाने  दिलेल्या निर्णयाचे मनापासून स्वागत केले पाहिजे. परंतु बिहार राज्यातील पोलिस महासंचालक श्री पांडे व  तथाकथित नेते या निर्णयाचा दाखला देत महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र पोलीस यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेऊन त्यांना नेमकं काय सिद्ध करायचं आहे हे न कळण्यासारखे  या देशातील लोक दुधखुळे नाहीत. एक भारत - श्रेष्ठ भारतचा नारा संपूर्ण देशासाठी दिला जातो परंतु प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्याला जाणीवपूर्वक वेगळे पाडण्याचे कटकारस्थान आहे असे वाटते.  या राज्यातील सर्व जनतेचे पोलिस यंत्रणेवर विश्वास आहे. परंतु या देशातील किंबहुना या राज्यातील काही घटकांकडून जगात प्रसिद्ध असणाऱ्या मुंबई  पोलीस यंत्रणा व कार्यपद्धतीविषयी समाजात गैरसमज निर्माण करून व निष्क्रियता सिद्ध करून नेमकं त्यांना साध्य काय करायचं आहे हे स्पष्ट होते. हा देश घटक राज्य व केंद्र शासित प्रदेश यांनी  बनलेला असून त्यामधील प्रत्येक व्यक्ती  या देशाचे नागरिक असून त्यांचे या देशावर मनापासून प्रेम आहे.परंतु या देशातील काही लोकांकडून महाराष्ट्र राज्य व पोलीस यंत्रणेविषयी गैरसमज निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे हे चुकीचा आहे. हा देश माझा आहे या देशातील प्रत्येक व्यक्ती आणि राज्य माझे आहे अशा प्रकारची शिकवण व संस्कार लहानपणापासून शाळेमध्ये दिले जाते पण प्रत्यक्षात बिहार पोलीस महासंचालक श्री.पांडे यांनी सुप्रीम कोर्टाचा  निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना जणू शत्रूचा एखादा भुभाग जिंकला आहे व महाराष्ट्र राज्याची पोलीस यंत्रणा कशी कुचकामी आहे अशा प्रकारचा अविर्भाव दाखवित आहेत. खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय प्रत्येक घटकाला मान्य करावाच लागतो तो मान्य करणे हे संविधानाला धरून आहे. पण उच्च पदस्थ अधिकाऱ्याकडून महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी संपूर्ण देशात संशयाचे वातावरण निर्माण करणे,महाराष्ट्रीयन लोकांचा या राज्यातील कायदा सुव्यवस्था विषयी चिंता व संशय घेण्यास प्रवृत्त करणे हा या देशाच्या एकतेचे व अखंडतेचे व न्यायाच्या दृष्टीने प्रगतीचे लक्षण नाही. हा देश माझा आहे या देशातील प्रत्येक घटकराज्य व केंद्रशासित प्रदेश यामध्ये कायदा व सुव्यवस्था जपण्याचे काम करणारे पोलिस यंत्रणा समान आहे असे मानून त्या त्या राज्यातील पोलिसांचे मनोबल वाढवून जनतेमध्ये एक प्रकारचा या घटका विषयी विश्वास निर्माण करणे अपेक्षित आहे. कोरोना या महामारीमध्ये मृत्यूला सामोरे जात  कुटुंबाकडे दुर्लक्ष करून  दिवस-रात्र  त्या त्या  राज्यातील तमाम जनतेची सेवा  प्रामाणिकपणे करणाऱ्या घटकांचा उल्लेख आपण कोरोना योद्धा म्हणून करतो त्यांच्याविषयी अशाप्रकारची नकारात्मक मानसिकता या देशातील लोकांची करणे म्हणजे या देशातील एकतेला व अखंडतेला धोका निर्माण करण्यासारखा आहे हे विसरून चालणार नाही. आम्हाला दोन राज्यातील राजकारण बघायचं नाही तर या देशातील जनतेला न्याय द्यायचा आहे . जर या देशातील बिहार राज्याचे पोलीस महासंचालक पांडे जी यांची प्रतिक्रिया जणूकाही एखाद्या  राज्यकर्त्या प्रमाणे आहे असे वाटते. त्यामुळे देशात बिहार राज्यांमधील कायदा व सुव्यवस्था हा सर्वोत्तम व सर्वोत्कृष्ट आहे व आपण त्याचे प्रमुख आहोत अशा पद्धतीचे त्यांची वर्तणूक दिसून येते परंतु प्रत्यक्षात केलेल्या राष्ट्रीय सर्वेनुसार या राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालच्या पातळीचे आहे हे सर्वांना माहीत आहे.वाईट याचे वाटते की त्या राज्यात  सर्वसामान्य लोकांना न्याय मिळत नाही तेथील कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेला असून हे राज्य गुन्हेगारी व इतर प्रकरणात देशात अव्वल आहे हे लक्षात ठेवावे. खरं म्हणजे सुशांत सिंह राजपूत याला न्याय मिळालाच पाहिजे याबाबत कोणाचेही दुमत नाही परंतु बिहार मधील प्रत्येक घटकाला अशा प्रकारचा न्याय मिळतो का याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.मी जरी महाराष्ट्रीयन असलो तरी पहिला देश त्यानंतर माझे राज्य मानत असलो तरी या राज्यातील  बारा कोटी लोकांचा  महाराष्ट्र  पोलिस यंत्रणेवर  विश्वास आहे परंतु मित्रांनो याच पोलिस यंत्रणेने कोरोनाच्या काळात वीर  योद्धा म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे व ते करीत आहेत यासाठी आमचे पोलीस मित्र शहीद झाले. परंतु मित्रांनो या यंत्रणेने  असा कुठलाही दुजाभाव या राज्यात स्थायिक असणाऱ्या परप्रांतीय नागरिकां विषयही दाखविला नाही. परंतु  सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा  वेगळा अर्थ लावून या राज्यातील पोलीस यंत्रणेविषयी संशय व बदनामी करणे योग्य नाही.हा देश माझा आहे ,एक देश एक संविधान याप्रमाणे या देशातील प्रत्येक घटक माझा आहे असे मानणे या देशातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे  पण या राज्यातील मुंबई पोलीस व पोलीस यंत्रणेची बदनामी कधीही मान्य करणार नाही कारण माझा व या देशातील प्रत्येक व्यक्तीचा या देशातील प्रत्येक राज्यातील  पोलिस यंत्रणेवर सार्थ विश्वास व अटल श्रद्धा आहे.मला सर्वात दुःख तेव्हा होते की या राज्यातील स्वतःला तथाकथित बुद्धिमान व मी महाराष्ट्र राज्याचा सेवक आहे अशा प्रकारचा सातत्याने प्रचार करणाऱ्या लोकांचे पितळ उघडे पडले आहे. महाराष्ट्रातील अशा ढोंगी लोकांच्याकडून या राज्याच्या पोलीस यंत्रणेची अर्थात या राज्यातील तमाम जनतेचा अपमान होत आहे हे लक्षात ठेवावे लागेल.आम्हाला राज्या राज्यांमधील  राजकारण नको आहे तर या देशातील प्रत्येक घटकाला म्हणजे तो वंचित, आदिवासी, दलित, गरीब ,शेतकरी ,कामगार,वेठ बिगारी व आर्थिक दृष्ट्या दुर्बल अशा प्रकारचा कोणताही घटक असो त्यालाही  न्याय त्याच तीव्रतेने व  गतीने हवा आहे. कारण एक देश एक संविधान आम्ही मानतो.सुशांत सिंग राजपूतला ज्या पद्धतीने या न्याय देण्यासाठी या देशातील यंत्रणा गतिमान आहे तोच न्याय या तमाम भारतवासीयांना मिळाला  पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला एक नारा "एक भारत श्रेष्ठ भारत" हे आम्हाला अपेक्षित आहे.

Post a Comment

0 Comments