आमदार ऋतुराज पाटील यांनी कसबा बावडा आणि लाईन परिसरातील आरोग्य आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला.कोरोना आणि पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कसबा बावडा येथील डॉक्टर्स, नगरसेवक व श्रीराम सोसायटीचे संचालक ,तसेच सामाजिक कार्यकर्ते, तरुण यांच्यासोबत स्वतंत्र चार विडिओ कॉन्फरन्स घेतल्या.या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये त्यांनी प्रत्येकी दोन तास संवाद साधून या सर्वांची मते जाणून घेतली.कोरोना आणि पूर या संकटांचा सर्वजण काळजीपूर्वक सामना करूया, असे आ.पाटील यांनी संगीतले. बावडा पॅव्हेलीयन मैदानावरील हॉल मध्ये कोविड केअर सेंटर लवकर सुरू करण्याचा निर्णय त्यांनी सर्वांशी चर्चा करून घेतला.
कसबा बावडा आणि लाईन बाजार येथील डॉक्टर्स बरोबर झालेल्या मीटिंगमध्ये स्थानिक डॉक्टर्स कडून पेशंट तपासणी करताना घेतली जाणारी काळजी , डॉक्टर्सना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.यावेळी जेष्ठ नागरिकांची काळजी घेणे, सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नसणाऱ्या पेशंटना होम क्वारंटाईन करणे, पॉझिटीव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती तात्काळ संकलीत करून त्यावर कार्यवाही करणे, बावड्यातील सर्व नागरिकांची घरोघरी जावून आरेाग्य तपासणी करणे,तसेच कसबा बावडा येथे प्रस्तावित असलेल्या कोरोना केयर सेंटर साठी लागणारे मनुष्यबळ, औषधे आदी उपलब्ध करून देणे, या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी, डॉ.संदीप नेजदार, डॉ.अजय शिंदे, डॉ.सुजित पाटील, डॉ.स्वप्नील तहसिलदार, डॉ. स्वप्नील मगदूम, डॉ.प्रसाद पाटील, डॉ.अतुल सपकाळ, डॉ. अनिल हेरलगे, डॉ.कसबेकर, डॉ. प्रविण नेजदार यांनी आपली मते मांडली.
कसबा बावड्यातील सर्व नगरसेवक व श्रीराम सोसायटीची पदाधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीत सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना रूग्णांसाठी कोव्हीड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. याबाबत अधिकाऱ्यांशी बोलून लवकर हे सेंटर सुरू करणार असल्याचे तसेच याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचे नमूद केले.
कोरोना सेंटर उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा, महापुराच्या पार्श्वभुमीवर नागरिकांचे स्थलांतर, त्यांना लागणारे जेवण, आरोग्य सुविधा, पाणी वाटपाचे नियोजन यावर चर्चा होवून अन्य सुविधा सज्ज ठेवण्याच्या सुचना आमदार पाटील यांनी दिल्या. या सुचनांची दखल घेत तातडीनं त्याबाबतचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची ग्वाही उपस्थित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी दिली.यावेळी नगरसेवक मोहन सालपे, अशोक जाधव, सुभाष बुचडे, डॉ.संदीप नेजदार, माधुरी लाड, श्रावण फडतारे आणि श्रीराम संस्थेचे संचालक उपस्थित होते.
आमदार पाटील यांनी बावडा आणि लाईन बाजार मधील सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांशी या परिस्थिती बाबत चर्चा करून त्यांची सविस्तर मते ऐकून घेतली.या संकटकाळात युवकांची रेस्क्यू टीम तयार करणे, कोविड केअर सेंटर, पुराच्या काळात औषधफवारणी,जनजागृती याबद्दल चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
0 Comments